Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुंबईतल्या एनएफडीसी संकुलात आयआयसीटीच्या पहिल्या कॅम्पसचे उद्घाटन

 मुंबईतल्या एनएफडीसी संकुलात आयआयसीटीच्या पहिल्या कॅम्पसचे उद्घाटन


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आयआयसीटीच्या लोगोचे अनावरण आणि वेव्हजच्या फलनिष्पत्ती अहवालाचे प्रकाशन


एनएफडीसी -नॅशनल म्युझिअम ऑफ इंडियन सिनेमा येथील गुलशन महल येथे वेव्हज भारत दालनाचे समारंभपूर्वक उद्घाटन


वेव्हज आता एक चळवळ बनली असून जागतिक स्तरावर तिचा जयघोष झाला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



एव्हीजीसी-एक्सआर व्यावसायिकांना आणि प्रशिक्षकांना प्रगत प्रशिक्षण देण्यासाठी आयआयसीटी पूर्णपणे उद्योग-संलग्न प्रगत कार्यक्रम पुरवेल- अश्विनी वैष्णव



मुंबई , 18 जुलै, 2025


मुंबईतल्या एनएफडीसी संकुलात आज सकाळी झालेल्या कार्यक्रमात ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ (आयआयसीटी) च्या पहिल्या कॅम्पसचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण, रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झाले. प्रशासकीय इमारत आणि वर्ग दोन्हींचे उदघाटन यावेळी झाले. त्यानंतर, एनएफडीसी-नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा (एनएमआयसी) येथील गुलशन महल येथे वेव्हज 2025 भारत दालनाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री वैष्णव यांच्या हस्ते करण्यात आले.  पहिल्या जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेच्या (वेव्हज 2025) फलनिष्पत्ती अहवालाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशीष शेलार, महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव राजेश सिंह मीना आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू हे देखील या प्रसंगी उपस्थित होते. आयआयसीटी लोगोचे अनावरण  आणि सतरा अभ्यासक्रमांचे औपचारिक उद्घाटनही या कार्यक्रमात झाले.



महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी  आणि सांस्कृतिक विकास महामंडळ लिमिटेडच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार आणि प्रसारभारती यांच्यात एक सामंजस्य करार यावेळी झाला. याद्वारे देशातील चित्रपट आणि दूरचित्रवाणी  क्षेत्रात सर्जनशीलतेचे महत्त्व ओळखून, एकात्मिक चित्रपट आणि दूरचित्रवाणी माध्यम केंद्र  विकसित करण्यासाठी सहकार्य करण्यात येणार आहे.  यामुळे माध्यम क्षेत्रात नवोन्मेष, कौशल्य विकास आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकतेला प्रोत्साहन मिळेल.


देशाची मनोरंजन राजधानी असणाऱ्या मुंबईत पहिल्या वेव्हज शिखर परिषदेचे आयोजन केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारचे आभार मानले. यावर्षी मुंबईत 1 ते 4 मे या कालावधीत पहिल्या वेव्हज शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.



सर्जनशील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी भारतात जागतिक कार्यक्रम आयोजित करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनाला अनुसरून, केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या एकत्रित प्रयत्नातून 'वेव्ह्स (WAVES)'चे यशस्वी आयोजन करण्यात आले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले, 'वेव्ह्स (WAVES)' आता एक चळवळ बनली आहे आणि या घटनेचे जागतिक स्तरावर पडसाद उमटत आहेत.



'वेव्ह्स (WAVES)' ने सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी एक नवीन मंथन सुरू केले आहे, असेही ते म्हणाले. 'वेव्ह्स (WAVES)' उपक्रमाला आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 150 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले. फिल्म सिटी येथे आकाराला येत असलेले आयआयसीटी कॅम्पस, हे केवळ जागतिक दर्जाचे शिक्षण देणारी संस्था म्हणूनच नव्हे, तर जगभरातील लोकांना आकर्षित करणारी वास्तू आणि सांस्कृतिक चिन्ह म्हणून उदयाला येईल, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, वेव्ह्स (WAVES) 2025 मध्ये प्रशंसेला पात्र ठरलेले आणि आता एनएमआयसी मधील गुलशन महाल येथे स्थलांतरित झालेले भारत पॅव्हेलियन मुंबईच्या पर्यटन सर्किटमध्ये एका नव्या सांस्कृतिक स्थळाची भर घालणार आहे. त्यांनी असेही सांगितले की, 'वेव्ह्स' दरम्यान जाहीर करण्यात आलेला आणि सुरुवातीला 42 कंपन्यांचा समावेश असलेला 'वेव्ह्स (WAVES)’ निर्देशांक, ज्याचे एकत्रित मूल्यांकन अंदाजे 93,000 कोटी रुपये होते, त्याने अल्पावधीतच 1 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. यामधून सर्जनशील  निर्माती अर्थव्यवस्थेची जलद वाढ आणि अफाट क्षमता स्पष्टपणे प्रतिबिंबित होते, असेही ते म्हणाले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.