*२ वर्षांनी 'कॉन्स्टेबल मंजू' मालिकेतून अक्षया नाईकचा दमदार कमबॅक!*
'सन मराठी'वरील 'कॉन्स्टेबल मंजू' ही मालिका सध्या प्रेक्षकांची लाडकी ठरत आहे. सत्याच्या आणि मंजूच्या लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात संकटांची मालिकाच सुरु झाली आहे. निवडणुकीत सत्याचा विजय झाल्यानंतर मुकादमला मारहाण केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. या पार्श्वभूमीवर आता मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे. सरकारी वकील म्हणून अभिनेत्री अक्षया नाईक झळकणार आहे. मंजू सत्याचा जामीन मिळवण्यासाठी धडपडत असतानाच सरकारी वकील समोर आल्यानंतर न्यायालयात काय निकाल लागेल, हे पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे. यापूर्वी अभिनेत्री अक्षया नाईकने सोज्वळ भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे पण आता या मालिकेतून अक्षया पहिल्यांदाच खलनायिकेची भूमिका साकारताना पाहायला मिळत आहे.
नव्या भूमिकेबद्दल अक्षया नाईक म्हणाली, "'कॉन्स्टेबल मंजू' या लोकप्रिय मालिकेत मी नवीन भूमिका साकारणार आहे. जवळपास २ वर्षांनी पुन्हा छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे या गोष्टीचा प्रचंड आनंद होतोय. आतापर्यंत मी कधीच खलनायिकेची भूमिका साकारली नव्हती पण आता अक्षया नव्याने प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. मालिकेत सरकारी वकिलाची भूमिका साकारणार आहे. माझ्या आईला वकील व्हायचं होतं आणि या मालिकेनिमित्त मी आईच स्वप्न पूर्ण केलं असं वाटतंय. पहिल्यांदाच सातारा मध्ये शूट करत आहे त्यामुळे उत्सुकता खूप वाढली आहे. अक्षया खलनायिकेची भूमिका साकारू शकते हा विश्वास प्रोडक्शन व चॅनेलने दाखवला त्या बद्दल त्यांचे मनापासून आभार मानते."