*इंद्रायणीला होणार विठुरायाचा साक्षात्कार !*
आषाढी एकादशी विशेष इंद्रायणी ६ जुलै संध्या ७ वा. दोन तासांचा भाग. कलर्स मराठीवर
*मुंबई ३ जुलै, २०२५ :* संपूर्ण महाराष्ट्रात वारीचं वातावरण आहे. विठू नामाच्या गजर, टाळ-मृदुंगाच्या तालावर थिरकणारी मनं! आषाढीची चाहूल लागली की भक्तीचा रंग भरून येतो. अशातच कलर्स मराठीवर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे इंद्रायणी मालिकेचा आषाढी एकादशी विशेष भाग. शकुंतलाची तब्येत घरात सगळ्यांचा चिंतेचा विषय झाला आहे. त्यात मावशीची काळजी घेण्यासाठी गोपाळ परत आला आहे. इंदू, अधू, व्यंकू महाराज यांचे देखील प्रयत्न सुरूच आहेत. विठूच्या वाडीत आषाढी एकादशीच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे कीर्तन होणार असून, यंदा शकुंतलाच्या तब्येतीमुळे व्यंकू महाराजांना कीर्तन करणे जमणार नसून गावाबाहेरून पारंपरिक कीर्तनकार अनुपलब्ध आहे. गावकऱ्यांच्या इच्छेचा मान राखून आणि दिग्रसकर घराण्याची परंपरा पुढे नेत,आनंदीच्या विरोधाला सामोरे जाऊन इंदू दिग्रसकरांची सून म्हणून या कीर्तनाची जबाबदारी स्वीकारते. इंद्रायणीचे हे दिग्रसकरांची सून म्हणून पहिलेवहिले कीर्तन असणार आहे, म्हणून गावात चर्चा तर होणारच. आषाढीला इंदूचं कीर्तन ऐकायची शकुंतलाची मनापासून इच्छा आहे, पण तिची तब्येत साथ देईल का, हा मोठा प्रश्न आहे. अचानक त्रास वाढल्यामुळे तिला admit केलं जातं, पण तिला वेळीच उपचार मिळू शकतील का? शकुंतलाच्या तब्येतीत सुधारणा व्हावी, ती बरी व्हावी म्हणून इंद्रायणीच्या भक्तीचा कस लागणार आहे आणि ती आषाढीला विठ्ठलासमोर कीर्तन करणार, त्याला आळवणार आहे. या आषाढी एकादशीच्या दिवशी इंद्रायणीला विठुरायाचा साक्षात्कार कसा होणार? इंद्रायणी दिग्रसकरचं कीर्तन कसं होणार? हे बघणं उत्सुकतेचं असणार आहे. तेव्हा नक्की बघा आषाढी एकादशी विशेष इंद्रायणी ६ जुलै संध्या ७ वा. दोन तासांचा विशेष भाग कलर्स मराठीवर.
*इंद्रायणी म्हणजेच कांची शिंदे म्हणाली,* "आषाढी एकादशी विशेष भागाचे चित्रीकरण खरंच खूप कठीण होते. चार ते पाच दिग्दर्शक काम करत होते. सेटच्या प्रत्येक कोपऱ्यात विठू नामाचा गजर, टाळ आणि मृदुंग... आम्हांला वारीला जाता आले नाही पण तो अनुभव आम्हाला सेटवर मिळाला. मालिकेत खरे वारकरी बोलाविण्यात आले होते. मी भाग्यवान आहे मला त्यांची सेवा करायला मिळाली. इंद्रायणी आता इंद्रायणी अधोक्षज दिग्रसकर म्हणून कीर्तन करणार आहे… घराण्याचा वारसा पुढे नेणार आहे. त्यांची परंपरा खंडित होऊ नये म्हणून लढणार आहे. आनंदीबाईंच्या विरोधात जाऊन ती किर्तन सेवेला उभी राहणार आहे. आणि इंद्रायणीसाठी हे खूप मोठं आव्हान आहे. विठुराया जशी इंदूची परीक्षा घेत असतो तसंच सेटवर देखील आमची परीक्षा घेतो. प्रचंड पावसापाण्यात आम्ही शूट करत आहोत. कोणच निराश नाहीये तितक्याच जिद्दीने शूट करतो आहे, विठुरायाच आम्हांला बळ देतो आहे. असं म्हणायला हरकत नाही."
हा भाग केवळ एका सोज्वळ कीर्तनाचा नाही, तर श्रद्धा, विज्ञान आणि भक्ती यांचा अनोखा मिलाप दर्शवणारा अनुभव असणार आहे. शकुंतलाची इंद्रायणीचं कीर्तन अनुभवण्याची इच्छा कशी पूर्ण होणार? जेव्हा जेव्हा भक्ताला देवाच्या दर्शनाला पोहोचणं शक्य होत नाही, वारीला जाणं शक्य होत नाही, तेव्हा भक्ताच्या श्रद्धेचा मान ठेवून देव भक्तासाठी धावून येतो ह्याची प्रचीती पाहायला मिळणार. इंद्रायणी मालिकेने आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या ‘प्रत्ययकारी’ रूपाची सुंदर अनुभूती प्रेक्षकांना दिसणार आहे. ज्याने प्रेक्षकांचा आषाढीचा दिवस भक्तिमय आणि त्यांच्या श्रद्धेला अजून दृढ करणारा ठरणार. आपण देखील अनुभवुया... तेव्हा नक्की बघा आषाढी एकादशी विशेष इंद्रायणी ६ जुलै संध्या ७ वा. दोन तासांचा विशेष भाग कलर्स मराठीवर.