*शिक्षण, सक्षमता आणि सन्मानासाठीची एका मुलीची संघर्षमय वाटचाल कमळी*
*प्रत्येक मुलीचा आवाज तिचं स्वप्न, तिचा संघर्ष – कमळी*
मुलगी शिकली, प्रगती झाली… किती सहज रुळलंय हे वाक्य आपल्या जिभेवर. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाचा पाया रचला म्हणून आज महाराष्ट्रातल्या स्त्रिया जागतिक स्तरावर जाऊन पोहोचल्या, यशस्वी झाल्या. शिक्षणाचं महत्व माहित नाही असं एकही घर महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही. पण अजूनही महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात अश्या दुर्गम जागा आहेत, जिथे शिक्षणाच्या सुविधा पोहोचलेल्या नाहीत, पण गावच्या मुलींमध्ये उच्च शिक्षणाचं स्वप्नं मात्र पेरलं गेलंय.
‘कमळी’ ही अश्याच एका मुलीची गोष्ट आहे… जिला माहितीये की ‘शिक्षण हाच उद्धाराचा आणि स्वाभिमानाचा मार्ग आहे’. त्यामुळेच लहानश्या खेड्यातून बाहेर पडून तिला मुंबईत यायचंय आणि सगळ्यात नावाजलेल्या महाविद्यालयात शिक्षण घेऊन मोठं व्हायचंय… आपल्या शिक्षणाचा उपयोग करुन तिला गावी महाविद्यालय उघडायचंय, जिथे तिच्यासारख्याच शिक्षणाची ओढ असणाऱ्या अनेक मुली शिकू शकतील. कमळीचा संघर्ष सुरु होतो जेव्हा तिला स्वप्नांची महानगरी मुंबईच्या महाविद्यालयात स्कॉलरशिप द्वारा ऍडमिशन मिळते. मुंबईत शिक्षणासाठी आलेली कमळी सामाजिक भेदभावाचा सामना करताना आणि त्यांच्याशी लढताना दिसणार आहे. तिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी असणार आहे.
कमळी महाराष्ट्रातील असंख्य कुटुंबांची कथा आहे. जिथे मुलींची स्वप्नं अद्याप अपूर्ण आहेत. कमळी ही त्या मुलीची कथा आहे जी शिकू इच्छिते, मोठं होऊ इच्छिते आणि आपल्या कुटुंबाला अभिमान वाटावा असं काहीतरी करु इच्छिते. *तेव्हा बघायला विसरू नका 'कमळी' ३० जूनपासून दररोज रात्री ९ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.*