Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा परिपूर्ण तात्विक जीवन जगल्या: ॲड.आशिष शेलार*

 *ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा परिपूर्ण तात्विक जीवन जगल्या: ॲड.आशिष शेलार*



ज्येष्ठ गायिका पद्मश्री श्रीमती माणिक वर्मा यांचा स्वर म्हणजे संगीतातला एक माणिक मोतीच. यंदाचे वर्ष 'माणिक वर्मा फाउंडेशनच्या सौजन्याने' ‘माणिक स्वर शताब्दी’ २०२४-२०२५ म्हणून साजरं केलं जाणार आहे. त्या निमित्ताने आयोजित एका विशेष कार्यक्रमाचे उदघाटन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार आणि अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी केले. गायिका राणी वर्मा यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी माणिक वर्मा फाउंडेशन आणि महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभाग यांच्या विद्यमाने ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्यावरील श्रीमती शोभा बोंद्रे लिखित आणि राजहंस प्रकाशित 'माणिक मोती' या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन प्रख्यात लेखक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकात खुद्द माणिकताईंनी आपल्या संगीत कारकीर्दीविषयी सांगितलेल्या आठवणी आहेत. या आठवणी या पुस्तकात क्यूआर कोडच्या सहाय्याने गायिका राणी वर्मा यांनी वाचकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. हे पुस्तक केवळ पुस्तक नाही तर आईच्या आठवणींचा पेटारा आहे अशा शब्दांत मनोगत व्यक्त करताना, या पुस्तकासाठी हातभर लागलेल्या सर्व मंडळींचे आभार गायिका राणी वर्मा यांनी मानले. 



ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या संपूर्ण कारकिर्दीवर नजर टाकली तर असंख्य पैलू आपल्याला दिसतील. ‘परिपूर्ण तात्विक असं जीवन गायिका माणिक वर्मा या जगल्या ‘माणिक मोती’ या पुस्तकातून त्यांच्या जीवनाचे हे सार फार सुरेखरित्या उलगडण्यात आलं असल्याचं प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी याप्रसंगी केले’.  


‘कलाकार म्हणून एकमेव’ असं माणिक वर्मा यांचं व्यक्तिमत्व असल्याचा गौरव लेखिका शोभा बोंद्रे यांनी यावेळी केला. ‘भारतात जो पर्यंत संगीत जिवंत आहे तोपर्यंत दैवी गायिका असलेल्या माणिक वर्मा यांचे नाव जिवंत असणार असं सांगत,माणिकताई यांच्या गाण्याबद्दलच्या अनेक आठवणी अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी यावेळी सांगितल्या’.  


एका पेक्षा एक अमूल्य अशा गीतांचा नजराणा सादर करणाऱ्या गायिका माणिक वर्मा या मला सर्वश्रेष्ठ वाटत आल्या आहेत. माणिक वर्मा यांच्या पुस्तकाचे प्रकाशन माझ्या हस्ते झाले याचा आनंद व्यक्त करताना लेखक अच्युत गोडबोले यांनी या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा दिल्या. विकास कशाळकर, चैतन्य कुंटे, शैला दातार, यांनीही माणिक वर्मा यांच्या आठवणींना उजळा दिला. 



माणिकताईंच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देण्याबरोबरच ‘हसले मनी चांदणे’ हा माणिक वर्मा यांच्या गीतांचा खास कार्यक्रम  संगीतकार कौशल इनामदार आणि त्यांच्या  सहकाऱ्यांनी सादर केला. माणिक वर्मा यांच्या गीतांची झलक यावेळी उपस्थितांची दाद मिळवून गेली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समिरा गुजर यांनी केले. राणी वर्मा, वंदना गुप्ते, भारती आचरेकर,अरुणा जयप्रकाश या माणिक वर्मा यांच्या चारही कन्या यावेळी उपस्थित होत्या.  


१६ मे ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांचा जन्मदिवस असून याप्रसंगी ख्यातनाम शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांना ‘माणिक रत्न’ पुरस्कार देण्यात येणार आहे. हा पुरस्कार तालयोगी प. सुरेश तळवलकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे. याच दिवशी चौरंगचे अशॊक हांडे आणि माणिक वर्मा फाउंडेशनतर्फे माणिक वर्मा यांच्या जीवनावरील ‘माणिक मोती’ हा कार्यक्रम यशवंत नाट्यगृह येथे सायंकाळी ७.३०वा. सादर होईल. हा कार्यक्रम ‘महाराष्ट्र स्टेट  रोड  डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांनी पुरस्कृत केला आहे. माणिक वर्मा यांच्या जन्म शताब्दीवर्षा निमित्ताने यंदा माणिक वर्मा फाउंडेशनतर्फे वेगवेगळ्या सांगीतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.