*आमिर खान प्रोडक्शन्सच्या ‘सितारे जमीन पर’मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत ७० हून अधिक नवे चेहरे!*
चित्रपटाच्या ट्रेलरनंतर वाढला प्रेक्षकांचा उत्साह, ‘तारे जमीन पर’च्या आठवणी जागवणारा हा स्पिरिचुअल सिक्वेल बनतोय नव्या कलाकारांसाठी एक महत्त्वाचा लॉन्चपॅड
आमिर खान यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सितारे जमीन पर’ नुकताच ट्रेलरसह प्रेक्षकांसमोर आला असून, या ट्रेलरला सर्व स्तरांवरून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. प्रेम, हास्य आणि आनंदाने भरलेला हा ट्रेलर ‘तारे जमीन पर’ या २००७ मधील सुपरहिट चित्रपटाच्या आठवणी जागवतो आणि एका भावनिक व मजेशीर प्रवासाची झलक देतो.
या चित्रपटाचे विशेष आकर्षण म्हणजे नव्या कलाकारांना दिलेला मोठा मंच. चित्रपटात १० नवोदित कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत, जे याआधी कधीही मोठ्या व्यावसायिक चित्रपटात झळकलेले नाहीत. याशिवाय, सुमारे ६० हून अधिक नव्या चेहऱ्यांना सपोर्टिंग आणि एन्सेंबल भूमिकांमध्ये संधी मिळणार आहे.
यामुळे ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट केवळ एक मनोरंजनपट न राहता, नवीन प्रतिभेला व्यासपीठ मिळवून देणारा ऐतिहासिक प्रोजेक्ट ठरणार आहे. नव्या पिढीतील कलावंतांना संधी देण्याच्या दृष्टिकोनातून आमिर खान प्रोडक्शन्सने घेतलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे.