*‘आंबट शौकीन’ ललित, वरुण, रेड्डी येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला*
*कलाकारांची दमदार फौज असलेल्या धमाल चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित*
तीन अतरंगी मित्रांची भन्नाट कहाणी सांगणाऱ्या ‘आंबट शौकीन’चा धमाल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरमध्ये ललित, वरूण आणि रेड्डी हे तीन खट्याळ मित्र दिसत असून ते हसवण्यासोबत विचार करायलाही भाग पाडत आहेत. प्रेम, मैत्री, सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत हरवलेली ओळख व मानसिक गुंतागुंत हे सगळे या चित्रपटात मांडण्यात आले आहे. सा तिघांच्या आंबटपणामुळे त्यांच्या आयुष्यात काय वादळ येणार, हे पाहाणे रंजक ठरणार आहे.
हेक्सव्हिजन एंटरटेनमेंट, एसएस अँड केएल ब्रदर्स प्रॉडक्शन्स, लॅब्रोस एंटरटेनमेंट आणि बिग ब्रेन प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘आंबट शौकीन’ चे दिग्दर्शन निखिल वैरागर यांनी केले आहे. येत्या १३ जून २०२५ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटात पूजा सावंत, अक्षय टंकसाळे, निखिल वैरागर, किरण गायकवाड यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्यासोबत प्रार्थना बेहेरे, भाऊ कदम, पार्थ भालेराव, अभिजीत खांडकेकर, मोनालिसा बागल, अमेय वाघ, चिन्मय संत, राहुल मगदूम यांच्यासह अनेक मातब्बर कलाकार झळकणार आहेत.
दिग्दर्शक निखिल वैरागर म्हणतात, “ ‘आंबट शौकीन’ ही फक्त मैत्री आणि प्रेम यांची धमाल गोष्ट नसून हलक्याफुलक्या व हास्यविनोदाच्या माध्यमातून मांडलेली अशी कथा आहे, जी आजच्या तरुणांच्या वास्तवाशी जोडलेली आहे. सोशल मीडियामुळे घडणारे भावनिक गुंतागुंतीचे परिणाम आणि त्यावर भाष्य करताना प्रेक्षकांना मनोरंजनातही अंतर्मुख करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे.”