मालती चाहरच्या ‘ओ माएरी’ स्क्रीनिंगला दीपक चाहर, नमन धीर आणि अन्य क्रिकेटपटू उपस्थित
अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मालती चाहर हिने आपल्या नवीन लघुपट ‘ओ मायरी’ साठी खास स्क्रीनिंगचं आयोजन केलं. हा सोहळा तिच्या जवळच्या मित्रमंडळींना आणि क्रिकेट व मनोरंजन क्षेत्रातील शुभेच्छुकांसाठी आयोजित करण्यात आला होता. मिस इंडिया फायनलिस्ट राहिलेली मालती चाहर हिने यापूर्वी ‘जीनियस’, ‘इश्क पश्मीना’, आणि ‘साड्डा विहा होया जी’ या म्युझिक व्हिडिओमधून अभिनय सादर केला आहे. तिच्या मागील दिग्दर्शित लघुपट ‘7 फेरे –
अ ड्रीम हाऊसवाइफ’ ला एका कोटीहून अधिक डिजिटल व्ह्यूज मिळाले होते. त्यानंतर आता ‘ओ मायरी’ या भावस्पर्शी कथेसोबत ती पुन्हा दिग्दर्शकाच्या भूमिकेत परतली आहे. हा लघुपट तिच्या स्वतःच्या टी कॉफी फिल्म्स बॅनरखाली तयार केला आहे.
मालती चाहर ही प्रसिद्ध क्रिकेटपटू दीपक चाहरची बहीण असून दीपक सध्या मुंबई इंडियन्सकडून खेळतो. मालती २०१८ च्या IPL मोसमात चेन्नई सुपर किंग्स संघासाठी स्टँडमधून केलेल्या जोशपूर्ण पाठिंब्यामुळे प्रकाशझोतात आली आणि तिला मिस्टरी गर्ल असा टॅग मिळाला होता.
या लघुपटाला दोन्ही क्षेत्रातील मित्रांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. फिल्मसाठीच नव्हे, तर मालती ज्या संवेदनशीलतेनं आणि स्पष्ट दृष्टिकोनानं कथा सांगतेय, त्यासाठी अनेक परिचित चेहरे तिला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. क्रिकेटपटू दीपक चाहर, नमन धीर, कर्ण शर्मा, राज बावा, कृष्णन श्रीजित आणि अश्विनी कुमार; अभिनेते मनोज जोशी, विक्रम कोछर आणि अर्फी लांबा; निर्माते महावीर जैन; समाजसेवक डॉ. अनील काशी मुरारका; दिग्दर्शक रविंद्र गौतम, आषू त्रिखा आणि अखिलेश जायसवाल; अँकर शेफाली बग्गा; आणि 'ओ माएरी' चित्रपटाची स्टारकास्ट अपूर्वा अरोरा, सोनाली सचदेव, केशव साधना, रुशद राणा आणि आस्था अभय या खास प्रसंगी उपस्थित होते. मालतीचे वडील लोकेन्द्र सिंह चाहर आणि काका देशराज सिंह चाहर हेही कार्यक्रमात सहभागी झाले होते.
ओ मायरी’ ही कथा आहे एका आई आणि मुलीची – ज्या त्यांच्या आतल्या खोल जखमांना सामोऱ्या जाताना, प्रेमाच्या नात्यांमधून दिलासा आणि नवं बळ शोधतात. फार काही न उघड करता सांगायचं झालं, तर या कथेत विश्वासघात, पिढ्यांमधील दुरावा आणि प्रेमाच्या मूक पण प्रभावी ताकदीचा अनुभव दिला जातो.
प्रेम आणि प्रोत्साहनाने भारावलेल्या मालतीने सांगितलं, “इथे येऊन मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे मी खूप आभार मानते.” ‘ओ मायरी’ विषयी ती म्हणाली, “हा लघुपट संघर्ष, कुटुंबातील नाती आणि स्त्रीच्या मानसिक बळाविषयी आहे. ही कथा प्रेम आणि स्थैर्य शोधणाऱ्या अनेकजणांच्या आयुष्यातील संघर्षांवर आधारित आहे. या सिनेमातून मी घराच्या चार भिंतीआड घडणाऱ्या मूक संघर्षांना आणि आई-मुलीच्या अतूट नात्याला उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे. या संपूर्ण युनिटने मनापासून मेहनत घेतली आहे.”
मालती चाहरने लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला ‘ओ मायरी’ या लघुपटात अपूर्वा अरोरा, सोनाली सचदेव, केशव साधना, रुशद राणा आणि आस्था अभय प्रमुख भूमिकेत आहेत. टी कॉफी फिल्म्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या या लघुपटाच्या तांत्रिक बाजू हाताळल्या आहेत – छायाचित्रण दिपीता सहगल, आर्ट डिरेक्शन आकांक्षा गुप्ता, एडिटर अमित कुमार, आणि कॉस्ट्युम डिझायनर हितेंद्र कापोपारा यांनी.