Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*शेलार मामा फाउंडेशनचा चैत्र नवरात्रौत्सव दिमाखात संपन्न*

 *शेलार मामा फाउंडेशनचा चैत्र नवरात्रौत्सव दिमाखात संपन्न*




माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणेने आणि खासदार मा. श्री. श्रीकांतजी एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शेलार मामा फाउंडेशनचे अध्यक्ष सुप्रसिद्ध अभिनेते मा. श्री. सुशांत अरुण शेलार यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या कुलस्वामिनी श्री. भैरी भवानी चैत्र नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. नऊ दिवस चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या हस्ते नवचंडी यज्ञ संपन्न! तर अनेक राजकीय नेते मंडळींनी मनोभावे घेतले देवीचे दर्शन!



भारतीय संस्कृतीमध्ये देवीला आदिशक्ती, जगत जननी मानलं जातं आणि तिच्या आराधनेचा प्रमुख उत्सव म्हणजे चैत्र नवरात्रौत्सव. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्यापासून या नवरात्रीला सुरवात होते. यंदा ३० मार्च २०२५ ते ७ एप्रिल २०२५ या कालावधीत मुंबईच्या लोअर परळ येथे प्रसिद्ध अभिनेते सुशांत अरुण शेलार यांच्या शेलार मामा फाउंडेश्नच्या चैत्र नवरात्रौत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या नऊ पहिल्या दिवशी अभिनेत्री भार्गवी चिरमुले तसेच अभिनेते सुशांत शेलार यांनी सपत्नीक देवीची प्राण प्रतिष्ठापना केली. तर पुढचे आठ दिवस मानसी साळवी, अभिजित खांडकेकर, सुखदा खांडकेकर, अर्चना नेवरेकर, प्रसाद ओक- मंजिरी ओक, स्वप्नील जोशी- लीना जोशी, रुपाली भोसले, अंकिता वालावलकर, दिव्या पुगावकर आणि हर्षदा खानविलकर या लोकप्रिय कलाकारांच्या हस्ते नवचंडी यज्ञ पार पडला. तसेच अभिनेते सुशांत शेलार आणि सौ. साक्षी सुशांत शेलार यांच्या हस्ते या यज्ञाची पूर्णाहुती संपन्न झाली. 



केवळ सिनेसृष्टीतील कलाकारांची मांदियाळी नव्हे तर अनेक राजकीय नेते मंडळींनी आवर्जून या चैत्र नवरात्रउत्सवाला भेट देऊन मनोभावे देवीचे दर्शन घेतले. माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री सन्माननीय आशिषजी शेलार साहेब यांनी मनोभावे देवीचे दर्शन घेऊन सांस्कृतिक कार्यक्रमांना देखील उपस्थिती लावली. तसेच कुर्ला विभागाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. मंगेशजी कुडाळकर साहेब, आमदार प्रकाश सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती या नौरात्रौत्सवाला लाभली. त्याच बरोबर शिवसेना नेत्या मीना ताई कांबळी, शिवसेना सचिव आमदार मनीषा ताई कायंदे ,शिवसेना प्रवक्त्या शीतल ताई म्हात्रे, शिवसेना उपनेत्या कला ताई शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना उपनेते राहुलजी शेवाळे, शिवसेना सचिव अभिजित अडसूळ, मा. आमदार सुनील शिंदे आदी मान्यवरांनी या नौरात्रौत्सवाला शुभेच्छा दिल्या. त्याच प्रमाणे विवेक फणसळकर पोलीस आयुक्त बृहन मुंबई यांनी वेळात वेळ काढून देवीचे दर्शन घेतले तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री चंदनशिवे हे सुद्धा या सोहळ्याला उपस्थित राहिले. 



या नऊ दिवसांमध्ये सकाळी यज्ञ आणि सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम असे कार्यक्रमांचे विभाजन करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक संचालनालयाच्या अंतर्गत सांस्कृतिक महोत्सव येथे नऊ दिवस साजरा करण्यात आला. या ठिकाणी सुप्रसिद्ध गायक मयूर सुकाळे, पद्मनाभ गायकवाड, स्वप्नील गोडबोले, आदिश तेलंग आणि मुग्धा कऱ्हाडे या सुप्रसिद्ध गायक गायिकांनी त्यांनी कला देवीच्या चरणी संगीतमय सेवा रुजू केली तर वेदा नेरुरकर, श्रेया खंडेलवाल, मधुरा परांजपे आणि दीप्ती रेगे यांच्या 'दि वुमनियाझ' या बँडने या त्यांच्या गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.





 तसेच या ठिकाणी देवीचा गोंधळ, कन्यापूजन , कुंकुमार्चन, महिलांसाठीच्या क्रीडा खेळ व महिलांचा अत्यंत आपुलकीचा आणि आवडता खेळ तो म्हणजे होम मिनिस्टर हा खेळ सुद्धा इथे उत्साहात पार पडला. सांस्कृतिक मोहोत्सवात नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ज्याचे परीक्षण प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक देवेंद्र शेलार यांनी केले. याच दरम्यान सौ. अश्विनी देवेंद्र शेलार यांच्या कलार्पण अकादमीचा 'शक्तिरंग' नेत्रदीपक नृत्यविशार इथे झाला तर शेवटच्या दिवशी भव्य रास गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी आणि गरबा प्रेमींनी याचा मनमुराद आनंद लुटला तर सर्वोत्कृष्ट गरबा खेळणाऱ्या रसिकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच विकास खरगे -मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक विभाग आणि विभिषण चवरे - संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या सहकार्याबद्दल शेलार मामा फाउंडेशन तर्फे त्यांचे मनापासून आभार!



शेलार मामा फाउंडेशन आयोजित चैत्र नवरात्रौत्सवात विविध कार्यक्क्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यापैकीच एक म्हणजे फोटोग्राफी, व्हिडिओ आणि रील्स स्पर्धा. या स्पर्धेला देखील उदंड प्रतिसाद मिळून विजेत्यांना रोख रक्कम आणि पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. त्यासह शेलार मामा फाउंडेशन आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या सहयोगाने भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा अनेक भाविकांना लाभ झाला. 


अध्यात्मिक क्रिया होम हवन, सांस्कृतिक कार्यक्रम, मान्यवर मंडळींची उपस्थिती आणि भाविकांच्या श्रद्धेने हा चैत्र नवरात्रौत्सवाचा सोहळा आनंदात पार पडला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.