*"खडतर प्रवास ते साक्षात पांडुरंगाची भूमिका साकारायला मिळणं म्हणजे भाग्यचं"* - तेजस महाजन
'सन मराठी'वर १० मार्च पासून संत सखुबाई यांचा भक्तिमय प्रवास प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी 'सखा माझा पांडुरंग' ही मालिका सोमवार ते रविवार सायंकाळी ७:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मालिकेत सखूबाईंची बालपणातील भूमिका बालकलाकार स्वराली खोमणे साकारणार आहे तर पांडुरंगाच्या भूमिकेत तेजस महाजन पाहायला मिळणार आहे. याचसह नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांना आपलंस करून घेणारे अभिनेते सुनील तावडे नरोत्तम यांची भूमिका साकारणार आहेत. मालिकेतून संत सखूबाईंचा प्रवास, पांडुरंगाप्रती असलेली त्यांची भक्ती पाहायला मिळणार आहे. मालिकाविश्वात पहिल्यांदाच महिला संत सखुबाई यांच्या जीवनावर मालिका येत असल्यामुळे ही मालिका प्रेक्षकांसाठी खास पर्वणी ठरणार आहे.
मालिकेत पांडुरंगाची भूमिका साकारणारा अभिनेता तेजस महाजनने या भूमिकेविषयी बोलताना सांगितले की, "'सखा माझा पांडुरंग' ही मालिका १० मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण मला अजूनही पांडुरंगाची भूमिका मी साकारत आहे यावर विश्वास बसत नाही. माझ्या कुटुंबातून सिनेविश्वात कोणी नातेवाईक नसताना इथवर पोहोचणं कठीण होतं. तेव्हापासून देव माझ्याबरोबर होता. जेव्हा या भूमिकेसाठी मला संगीत कुलकर्णी सरांचा फोन आला तेव्हा मी थोड्याच वेळात त्यांना ऑडिशन पाठवली आणि त्याच दिवशी माझं या भूमिकेसाठी सिलेक्शन झालं. देव आपली परीक्षा घेत असतो हे ऐकलय पण कधी देवाची भूमिका मी साकारू शकतो हा विचार नव्हता केला. पांडुरंगाच्या वेशभूषेत मी स्वतःला पाहिलं तेव्हा बाप रे हे शब्द उच्चरले गेले. लगेच आईला फोटो पाठवला आणि साक्षात पांडुरंग पाहून ती ही भरून पावली."
यापुढे तेजस म्हणाला की, "या भूमिकेसाठी मी 'सन मराठी' वाहिनीचे आभार मानू इच्छितो कारण या भूमिकेमुळे माझ्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं आहे. कोणत्याच कलाकाराला संघर्ष चुकत नाही पण योग्य वेळ आली की देव आपल्याला भरभरून देतो. मी अगदीच लहान असताना पंढरपूरला गेलो होतो पण या भूमिकेच्या रूपात पांडुरंगाने मला स्वतःहून हाक मारली आहे असं म्हणायला हरकत नाही. मुख्य म्हणजे या भूमिकेमुळे मी पांडुरंगाच्या अगदी जवळ राहून त्यांना अनुभवणार आहे. या भूमिकेला मी १०० टक्के न्याय मिळवून देणार आहे. प्रेक्षकांना ही भूमिका आणि आमची मालिका नक्कीच आवडेल. संत सखुबाई व त्यांना असणारी पांडुरंगाची ओढ नक्की का आहे? ही गोष्ट उलगडत जाणार आहे. त्यामुळे खूप भीती, गगनात न मावणारा आनंद अशा दोन्ही भावना आहेत. प्रेक्षकांनी आमच्या मालिकेला भरभरून प्रेम द्यावं हीच इच्छा आहे."