*“आई तुळजाभवानी मालिका मिळाली हि देवीचीच इच्छा” – पूजा काळे*
*नृत्याचे शिक्षण कुठून घेतलेस ?*
अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ मिरजमधून भरत नाट्यम नृत्यात विशारद पूर्ण करून अलंकार करीत आहे. अगदी तीन वर्षाची होते तेव्हा पासुनच आमच्या नटराज नृत्यालयाच्या वार्षिक नृत्यउत्सवात नृत्याचे स्टेज परफॉर्मन्स करत आले आहे. त्यामुळे शास्त्रीय नृत्याबरोबर संपूर्ण भारतातील लोकनृत्य करायला मिळाले. इतकेच नाही तर वेस्टर्न नृत्य ही त्यामुळे शिकायला मिळाले. गुरू मुक्ताबाला जोशी आणि गुरू अमृता साळवी यांच्याकडे कथ्थक नृत्याचे शिक्षण घेतले. तसेच मी नृत्याचे अनेक प्रकार सादर करते ज्यात ओडिसी, मोहिनियत्तम, कुचीपुडी नृत्यदेखील मी करते. पण, नृत्यासोबतच शास्त्रीय गायन मी श्री मनोज माळी ह्यांच्याकडे शिकले आहे.
*आई तुळजाभवानी मालिकेचा अनुभव सांगशील ?*
लहाणपणापासून सुरू असलेला नृत्याचा रियाज आणि माझी नृत्याची प्रचंड आवड ह्यामुळे मालिका करताना जेव्हा कुठे नृत्याचा टेक असेल तेव्हा मी खूप खुश असते. अभिनयासाठी हावभाव करताना नृत्याचा फायदाच होता. पौराणिक कथांचे नृत्यामध्ये आम्ही सादरीकरण करतो. अशावेळी अंग ,प्रत्यंग ,उपांगाचा वापर होऊन नवरस सादर करतो. ती सवय असल्याने अभिनय करायला सोपे जाते. आई तुळजाभवानी मालिकेची विचारणा जेव्हा झाली तेव्हा माझ्या मनात चटकन उत्तर आलं होतं नक्कीच करायची आहे मला हि मालिका... कारण तुळजाभवानी सोबत माझ्या घराचं जून नातं आहे, आमची ती कुलस्वामिनी आहे. नृत्यात मी अनेकदा तांडव सादर केले आहे. पण, साक्षात तेच साकारायला मिळणं हे मी माझं भाग्य समजते . आई तुळजाभवानी मालिकेसाठी ३५० ते ४०० हुन अधिक ऑडिशन घेतल्या गेल्या होत्या ज्यातून माझी निवड झाली... माझ्या नशिबात हि मालिका लिहिली होती असं म्हणायला हरकत नाही. देवीचीच इच्छा असावी म्हणून माझ्यापर्यंत हि मालिका आली.
*मालिकेत तांडव नृत्य केलंस त्याचा अनुभव सांगशील ?*
जेव्हा मला कळलं मालिकेत असं आहे तेव्हा पहिले तर मी खूप खुश झाली. कारण नृत्य हा माझा खूपच जवळचा विषय आहे आणि आता मला ते मालिकेत सादर करण्याची संधी मिळते आहे त्यामुळे मला खुपचं आनंद झाला. शूटिंग आणि प्रत्यक्षात सादर करणे यात निश्चितच खूप फरक आहे. पण, मालिकेत तांडव मी ऑन द स्पॉट केलं होतं. मला आमचे दिगदर्शक सर बोले की तांडव सादर करायचा आहे कधीपर्यंत प्रैक्टिस करुन आपण शूट करुयात. तेव्हा मी म्हणाले ऑन द स्पॉट केले तरी चालेल. मी तांडव सादर करण्याआधी अजिबात रियाझ केला नाही कदाचित देवीनेच मला तेव्हा बळ दिले.
*लहानपणापासून नृत्याशी काही संबंध आहे का ?*
आई नृत्य दिगदर्शक असल्याने अनेक म्युझिक अल्बममध्ये तिच्या विद्यार्थ्यांन सोबत नृत्य सादर केले आहे. तेव्हा मी सतत तिच्या बरोबर असायचे..त्या मुळे कोळी नृत्य, जागरण गोंधळ ,जोगवा, पहात आले आहे आणि करत ही आलेय. शास्त्रीय नृत्याची माझी गुरूअर्थात माझी आई राजश्री काळे आहे.. श्री विक्रमन पिल्लई, श्री दीपक मुजूमदार हे माझे गुरू.
*आई तुळजाभवानी मालिका सुरु आहे तर वेळ कशी काढतेस रियाझासाठी ?*
नृत्य शिकत असताना आपल्याला वेळात वेळ काढावाच लागतो. मला नृत्याची खुप आवड आहे, त्यामुळे मालिकेच्या हेक्टिक schedule मधून मी रियाझासाठी थोडा वेळ तरी काढते. मालिकेमध्ये तांडव किंवा कोणतेही नृत्य करायचे असल्यास मी खुप जास्तं उत्सुक असते. मी जवळ जवळ सगळेच डांस स्टाइल शिकले आहे, त्यामुळे मला खूप सोप्पं पडत.