*रंग प्रेमाचे, बेधुंद मनाचे; 'सन मराठी'वर साजरा होणार व्हॅलेंटाईन वीक*
*रंग प्रेमाचे, बेधुंद मनाचे,'सन मराठी'च्या मालिकांमध्ये बहरणार प्रेम*
१४ फेब्रुवारी म्हटलं तर सर्वत्र प्रेमाचा दिवस साजरा केला जातो. 'सन मराठी'वरील सगळ्याच मालिकांमध्ये प्रेमाचा आठवडा साजरा होताना पाहायला मिळणार आहे. प्रत्येक मालिकेचं कथानक प्रेक्षकांना आपलंस करण्यात यशस्वी ठरलं आहे. 'कॉन्स्टेबल मंजू' या मालिकेतील सत्या-मंजू या जोडीने प्रेक्षकांना जणू वेड लावलं आहे. १४ फेब्रुवारी रोजी मंजू सत्याला प्रपोज करणार असल्याचा प्रोमो समोर आला आहे. याचसह 'तुझी माझी जमली जोडी' या मालिकेत सईच्या आयुष्यात विक्रमच्या एन्ट्रीमुळे मोठं वादळ आलं आहे. विक्रमपासून सई देवांशला कसं वाचवणार हे पाहणं सुद्धा रंजक ठरणार आहे. तसेच 'मुलगी पसंत आहे' या मालिकेत श्रेयस बरा झाल्याने तारा- श्रेयस मध्ये रोमँटिक क्षणही पाहायला मिळत आहेत. व्हॅलेंटाईन वीक निमित्त कलाकारांनी त्यांच्या मते प्रेम म्हणजे नक्की काय? या बाबतीत त्यांचं मत व्यक्त केलं आहे.
'मुलगी पसंत आहे' मालिकेतील श्रेयस म्हणजेच अभिनेता संग्राम समेळ म्हणाला, "प्रेम म्हणजे अशी भावना की समोरच्या व्यक्तीसाठी काहीतरी छान करत राहावं, ती व्यक्ती आनंदी राहील अशा गोष्टी करत राहीलं पाहिजे. एकमेकांना समजून घेणं, एकमेकांचा आधार बनणं म्हणजेच प्रेम. प्रेमाचा एक दिवस नसतो पण तरीही हा खास दिवस मला माझ्या बायकोबरोबर साजरा करायला आवडेल. मालिकेत सुद्धा तारा- श्रेयसचा व्हॅलेंटाईन दिवस साजरा होत आहे. त्यामुळे मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील ही खात्री आहे." याचसह मालिकेत तारा हे पात्र साकारणारी अभिनेत्री कल्याणी टिभे म्हणाली, "आयुष्यात प्रेम खूप महत्त्वाचं असतं. प्रेमामुळेच नाती जोडली जातात. बरीच वर्ष कामानिमित्त मी कुटुंबापासून दूर राहते म्हणून हा प्रेमाचा दिवस मला माझ्या आई-बाबांबरोबर साजरा करायला आवडेल."
'तुझी माझी जमली जोडी' मालिकेतील सई म्हणजेच अभिनेत्री अस्मिता देशमुख म्हणाली, "आपल्याला समजून घेणारी, आपल्या सुखात सुख शोधणारी व्यक्ती भेटली तरच आपण प्रेमात पडू शकतो. क्षणार्धात मैत्री होऊ शकते, आकर्षणही वाटू शकतं पण प्रेमाचा अंकूर फुटण्यासाठी आधी खरेपणा आणि विश्वासाची पेरणी करावी लागते आणि हे ज्याला जमतं तोच आयुष्यात प्रेम करुन ते टिकवू शकतो. खरं तर प्रेमाला विशेष असा दिवस नसतो प्रेमामुळे दिवस विशेष होतो आणि ज्यांचामुळे माझा रोजचा दिवस हा विशेष जातो अश्या माझ्या जवळच्या व्यक्तींसोबत हा दिवस मला साजरा करायला नक्की आवडेल."