Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*"ध्यास सन्मान" पुरस्कार जाहीर!*

 *"ध्यास सन्मान" पुरस्कार जाहीर!*

 

*"पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हेड अँड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया", मालवण स्थित डॉ. सुभाष दिघे यांना २०२४ चे 'गगन सदन तेजोमय', दिवाळी पहाट सोहळ्यात प्रदान करण्यात येणार!*



*ॲड फिजच्या “गगन सदन तेजोमय”चे विसावे वर्ष!* 

*१९ वर्षात ५७ सामाजिक कार्यकर्ते आणि संस्थांचा गौरव!!*


*"मोगरा फुलाला" संत ज्ञानेश्वरांच्या दैवी रचनांची सुरेल मैफिल!*


*मुंबई - २३ ऑक्टो : (सांस्कृतिक प्रतिनिधी)* समाजासाठी प्रतिकुल परिस्थितीत नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या अनोळखी व्यक्ती व संस्था यांचा 'ॲड फिज'द्वारे “गगन सदन तेजोमय” या दिवाळी पहाट सोहळ्यात 'ध्यास सन्मान' देऊन गौरव करण्याची परंपरा आहे. सामाजिक बांधिलकी जपत दिवाळी सण साजरा करण्याची ही अनोखी परंपरा विनोद आणि महेंद्र पवार यांनी १९ वर्षांपूर्वी सुरु केली होती. आपल्या संस्कृतीचे पावित्र्य त्यासोबत उत्तम दर्जा हे  “गगन सदन तेजोमय” वैशिष्ट्य आहे. प्रसिध्दी पत्रकाद्वारे आज या वर्षीचे 'ध्यास सन्मान' 'ॲड फिज'ने जाहीर केले असून "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हेड अँड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया" या सेवाभावी संस्थेला तर “सेवा हेच जीवन” हे ब्रीदवाक्य समजून आयुष्यभर रुग्णांची सेवा करणाऱ्या मालवण स्थित डॉ. सुभाष दिघे(MBBS) यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.


'ॲड फिज' गेली १९ वर्ष विविध संकल्पना घेऊन “गगन सदन तेजोमय” हा दिवाळी पहाट कार्यक्रम करीत आली आहे. संस्थेचे हे २० वे वर्ष असून गेली १९ वर्ष समाजासाठी झटणाऱ्या आणि प्रतिकूल परिस्थितीत नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ति व संस्था यांचा "ध्यास सन्मान" पुरस्कार देऊन गौरव केला जातो. रुपये २५,०००/- रोख, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.  


मुंबईतील डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानकाजवळ असलेली 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हेड अँड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' प्रतिकुल परिस्थितीतील कॅन्सर रुग्णांसाठी दिलासादायक संस्था म्हणून उभी राहिली आहे. जगविख्यात 'टाटा रुग्णालया'सोबतच आता मुंबईला हक्काचे आणखी एक कॅन्सरचे रुग्णालय मिळाले आहे. दरवर्षी, ५ लाखांहून अधिक रुग्णांना डोके आणि मानेच्या कर्करोगाचे निदान होते.




 या पुरस्काराचे दुसरे मानकरी असलेल्या डॉ. सुभाष दिघे यांचा जन्म आणि शिक्षण मुंबई-दादर येथील आहे. 1964 ते 1970 या काळात त्यांनी सर जे जे हॉस्पिटल, मुंबई इथे MBBS ची पदवी संपादन केली. त्यानंतर दोन वर्षाच्या सक्तीच्या नोकरीसाठी कोकणातील 'आचरा प्राथमिक आरोग्य केंद्र' इथे नेमणूक झाली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याशी त्यांचा प्रथम संबंध आला. त्यावेळी संपूर्ण कोकण पायाभूत गोष्टींसाठी संघर्ष करीत होता. रस्ते नाही, वीज नाही, गाड्या नाहीत, कायम पूरसदृष्य स्थिती, आर्थिक दारिद्र्य. वैद्यकीय सेवांचा अभाव, डाॅक्टर, मेडिकल दुकान नाहीत. घरात आणि गावात अस्वच्छता आणि सोबतीला अंधश्रद्धा. त्यावेळी लोकांसोबतच सेवा देणाऱ्या डॉक्टरांचे प्रचंड हाल होत असत अश्या परिस्थतीत डॉ. सुभाष दिघे यांनी वीस पंचवीस किमी  पायपीट करून तर कधी होडीने जाऊन कंदिलाच्या लुकलुकत्या प्रकाशात रुग्णसेवा, प्रसूती, सर्पदंशाने मृत्यूशैयेवरील रुग्णांना जीवनदान देण्याचे सुरु केलेले सेवाकार्य तेव्हापासून आजमितीस अविरत सुरु ठेवले  आहे. मुंबईतून स्वतःच्या खर्चाने औषधे आणून रुग्णांचे जीव वाचविणाऱ्या या धन्वंतरीचा 'गगन सदन तेजोमय'च्या ध्यास सन्मानाने केला जाणारा सन्मान विशेष आहे. 


यावर्षी ‘गगन सदन तेजोमय’ दिवाळी पहाट गुरुवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी पहाटे ७.०० वा. यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा, मुंबई येथे साजरी होणार असून 'मोगरा फुलला' ही संत ज्ञानेश्वरांच्या दैवी रचनांची सुरेल मैफल रंगणार आहे. या मैफिलीची संकल्पना आणि दिग्दर्शन राहुल रानडे यांचे असून संगीत संयोजन कमलेश भडकमकर तर सहभाग श्रीरंग भावे, शाल्मली सुखटणकर, निलेश परब, प्रसाद पाध्ये, शशांक हाडकर, दर्शना जोग, अमोघ दांडेकर, अभय ओक यांचा असणार आहे. या मैफिलीचे निरूपण विदुषी धनश्री लेले करणार असून निर्मिती विनोद पवार तर संयोजन महेंद्र पवार यांचे असून प्रस्तुती 'ॲड  फिज'ची असणार आहे. 



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.