Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*'स्टार प्लस' वाहिनीवरील लोकप्रिय ‘अनुपमा’ ही मालिका घेणार ‘जनरेशन लीप’!*

 *'स्टार प्लस' वाहिनीवरील लोकप्रिय ‘अनुपमा’ ही मालिका घेणार ‘जनरेशन लीप’!* 


नव्या भूमिकेत झळकणार- रूपाली गांगुली, अलिशा परवीन आणि शिवम खजुरिया! ‘अनुपमा’च्या या नव्या, मोहक प्रवासाचे साक्षीदार होण्यासाठी सज्ज व्हा!


‘अनुपमा’  या मालिकेला प्रेक्षकांनी वेळोवेळी पसंतीची पावती दिली आहे आणि या मालिकेचे भरभरून कौतुक केले आहे. या मालिकेने आजच्या घडीला लोकप्रियतेची आगळी उंची गाठली आहे. प्रेक्षकांच्या मनाची पकड घेणारी कथा असलेल्या ‘अनुपमा’ या मालिकेने ‘टीआरपी’च्या आलेखावरही वर्चस्व गाजवले आहे. ही मालिका चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. खिळवून ठेवणारे नाट्य आणि या मालिकेला मिळणारी नवी वळणे यामुळे या मालिकेला प्रेक्षकांची कायम पसंती राहिली आहे. 




या मालिकेच्या प्रत्येक नव्या भागात, प्रेक्षकांना नवे काहीतरी रंजक आणि वेधक गवसते. ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘अनुपमा’ या मालिकेला नेहमीच प्रेक्षकांची मोठी प्रशंसा आणि प्रेम लाभले आहे. असे असताना, आता प्रेक्षकांकरता आणखी एक आश्चर्य उलगडणार आहे, याचे कारण ‘अनुपमा’ ही मालिका चक्क एका पिढीची झेप घेत, नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘अनुपमा’ या मालिकेतील मुख्य भूमिकेत रूपाली गांगुली असून, आणखी दोन नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आद्याचे पात्र अलिशा परवीन साकारणार असून, आद्याचा जीव ज्याच्यावर जडला आहे, ती- प्रेम ही व्यक्तिरेखा शिवम खजुरिया वठवणार आहे.


या मालिकेच्या निर्मात्यांनी अलीकडेच नव्या रूपातील मालिकेचा एक वेधक प्रोमो प्रदर्शित केला आहे, ज्यात ‘अनुपमा’च्या नव्या प्रवासाची झलक मिळते. यात अनुपमा वेगळ्या रूपात प्रेक्षकांना भेटते आणि ‘अनु की रसोई’ हा तिचा स्वत:चा व्यवसाय चालविण्यात ती व्यग्र आहे. ‘अनुपमा’ला तिच्या कुटुंबाची आठवण येत असते आणि आद्या या तिच्या लेकीला भेटण्याची तिची तीव्र इच्छा असते.   दुसरीकडे, आद्या आता एक टूर गाईड बनली आहे आणि एके दिवशी आद्या एका मंदिरात प्रेमला भेटते. आद्याला बघताच क्षणी प्रेमला तिची जणू मोहिनी पडते. आद्या नात्यातील गुंतागुंतीचा विचार करत आहे आणि तिच्या आईच्या जगतापासून दूर आहे. एका नव्या, अनोळखी व्यक्तीच्या प्रयत्नाने आई आणि मुलीतील नाते सुधारेल का? मुलीला शोधून काढण्याचे आईचे प्रयत्न सफल होतील का?


१४ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘अनुपमा’ मालिकेचा हा नवा प्रवास बघायला विसरू नका.


राजन शाही निर्मित, ‘अनुपमा’ ही मालिका सोमवार ते रविवार- दररोज रात्री १० वाजता ‘स्टार प्लस’वर प्रसारित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.