स्पेनचे राष्ट्रअध्यक्ष पेड्रो सांचेझ यांनी त्यांच्या पहिल्या भारत दौऱ्यात यशराज फिल्म्सला भेट दिली!
स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेड्रो सांचेज सध्या भारताच्या दौऱ्यावर असून, त्यांनी मुंबईतील यश राज फिल्म्स या प्रतिष्ठित प्रोडक्शन हाऊसला भेट दिली. यश राज फिल्म्स चे सीईओ अक्षय विधानी यांच्याशी त्यांनी संवाद साधला आणि यश राज फिल्म्सच्या ५० वर्षांच्या परंपरेबद्दल तसेच भारतीय चित्रपट उद्योगाच्या पुढील ५ वर्षांच्या प्रगतीबद्दल चर्चा केली.
१८ वर्षांनंतर प्रथमच स्पेनचा राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान भारताला भेट देत आहे, आणि पेड्रो यांची यश राज फिल्म्सला भेट हिंदी चित्रपटसृष्टीसाठी एक महत्त्वपूर्ण क्षण आहे. यश राज फिल्म्स आणि स्पेन यांच्यात सांस्कृतिक संबंध असून 'पठाण' आणि 'वॉर २' या चित्रपटांचे स्पेनमधील मोहक ठिकाणी शूटिंग झाले आहे.
"काल आम्हाला स्पेनचे राष्ट्राध्यक्ष यश राज फिल्म्समध्ये स्वागत करण्याचा सन्मान मिळाला. त्यांच्या स्टुडिओ भेटीने आमच्या ५० वर्षांच्या संपन्न परंपरेत एक मोलाचा क्षण जोडला गेला आहे. आम्हाला त्यांच्या समवेत भारतीय चित्रपट उद्योगात दिलेल्या योगदानाबद्दल चर्चा करण्याची संधी मिळाली, आणि स्पेन व यश राज फिल्म्समधील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यासंबंधी चर्चा झाली," असे अक्षय विधानी यांनी सांगितले. "स्पेनने आम्हाला कायम पाठिंबा दिला आहे आणि राष्ट्राध्यक्षांची आमच्या स्टुडिओला भेट हा अभिमानाचा क्षण होता."