Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी पौराणिक मालिका उदे गं अंबे कथा साडे तीन शक्तिपीठांची

स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी पौराणिक मालिका उदे गं अंबे कथा साडे तीन शक्तिपीठांची सुप्रसिद्ध अभिनेता देवदत्त नागे साकारणार भगवान शिवशंकर
विठुमाऊली आणि दख्खनचा राजा जोतिबाच्या यशानंतर स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे नवी पौराणिक मालिका ‘उदे गं अंबे... कथा साडेतीन शक्तिपीठांची’. देवी आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठं ही महाराष्ट्रवासियांची असीम श्रद्धास्थानं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात साडेतीन शक्तिपीठांपैकी कुठल्या ना कुठल्या देवीचं कुलदेवता म्हणून पूजन केलं जातं. ही आदिशक्ती आईप्रमाणे कुटुंबाचं रक्षण करते. पण आपल्या कुटुंबासाठी पूजनीय असलेल्या या आईसमान देवीचं महात्म्य आणि इतिहास सर्वांना माहित असतोच असं नाही. तो इतिहास सविस्तरपणे आणि रोचक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न उदे गं अंबे...कथा साडेतीन शक्तिपीठांची या भव्यदिव्य पौराणिक मालिकेतून करण्यात येणार आहे.
साडेतीन शक्तिपीठांचा महिमा जाणून घेण्यासाठी मुळात त्यांची निर्मिती कशी झाली हे समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणूनच शक्तिरूप असलेल्या देवी सती आणि शिवशंकराच्या कथेपासून या मालिकेची सुरुवात होईल. सुप्रसिद्ध अभिनेता देवदत्त नागे या मालिकेत भगवान शिवशंकर साकारणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने जवळपास १० वर्षांनंतर तो स्टार प्रवाहच्या मालिकेत झळकणार आहे. देवयानी या मालिकेत देवदत्त याने साकारलेल्या सम्राटराव विखे-पाटील या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. देवयानीनंतर तो पुन्हा एकदा स्टार प्रवाहसोबत जोडला जातोय. उदे गं अंबे कथा साडेतीन शक्तीपीठांची या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना देवदत्त नागे म्हणाले, टीव्ही माझं अत्यंत आवडीचं माध्यम आहे. कारण टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही प्रेक्षकांच्या फक्त घरात नाही तर मनात देखिल पोहोचता. स्टार प्रवाहच्या देवयानी मालिकेने मला अभिनेता म्हणून ओळख दिली.
जवळपास १० वर्षांनंतर मी पुन्हा एकदा स्टार प्रवाहसोबत काम करतोय. प्रेक्षकांपर्यंत मालिकेच्या निमित्ताने साडेतीन शक्तीपीठांची गोष्ट पोहोचवण्याची संधी मिळत आहे हे मी माझं भाग्य समजतो. शिव-शक्तीचं नातं अतूट आहे. जिथे शिव आहे तिथे शक्ती आहे. त्यामुळे साडे-तीन शक्तीपीठींच्या या गोष्टीमध्ये शिवशंकराचे नेमके कोणते अवतार होते आणि त्यामागे नेमकी कोणती कथा दडली आहे हे या मालिकेतून साकारण्याचा प्रयत्न असेल. महादेवांपुढे श्रद्धेने लीन होऊन या नव्या प्रोजेक्टची सुरुवात करतोय. प्रेक्षकांचा आशीर्वाद आणि प्रेम दोन्ही मिळावं हीच अपेक्षा आहे. तेव्हा पाहायला विसरु नका नवी पौराणिक मालिका उदे गं अंबे कथा साडे तीन शक्तिपीठांची.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.