" आपका अपना झाकिर’मध्ये श्वेता तिवारी असणार नवीन IT गर्ल
July 22, 2024
0
आपका अपना झाकिर’मध्ये श्वेता तिवारी असणार नवीन IT गर्ल
लोकप्रिय विनोदवीर झाकिर खान आता ‘आपका अपना झाकिर’ या आपल्या नव्या कोऱ्या शो सह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे. हा शो सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर लवकरच सुरू होणार असून त्यात विनोद आणि जीवनातील हृदयस्पर्शी अनुभवांचे एक मस्त मिश्रण बघायला मिळेल. झाकिर खानचा विनोद नेहमीच काळाशी अत्यंत सुसंगत असतो. या शोमध्ये तो जीवनातील चढ-उतारांबद्दलचा त्याचा अनोखा दृष्टिकोन घेऊन येत आहे. त्याच्या शैलीत अगदी लौकिक गोष्टींमधील देखील मजा उलगडत जाते. या शोमध्ये झाकिरसोबत इतर काही गुणी कलाकार दिसतील, जे या ‘सख्त लौंडा’च्या सोबतीने प्रेक्षकांचे परिपूर्ण मनोरंजन करतील. त्यापैकी एक कलाकार आहे, टेलिव्हिजनची जणू ‘सून’ असलेली श्वेता तिवारी!
श्वेता या शोमध्ये ‘द IT गर्ल’ साकारत आहे, जी नेहमी या खेळात एक पाऊल पुढे असते. श्वेता या शोमध्ये स्वतः श्वेता म्हणूनच दिसणार आहे. आपल्या या नव्या शोविषयी बोलताना श्वेता म्हणाली, “बऱ्याच काळानंतर यासारखा शो करताना मी रोमांचित झाले आहे.
या शोमध्ये प्रेक्षकांना माझी एक नवीन बाजू बघायला मिळेल. एक कला प्रकार म्हणून कॉमेडी सध्या खूप बदलत आहे, विकसित होत आहे. अशा कोणत्याही बदलात सामील व्हायला मला नेहमीच आवडतं. मला जेव्हा ‘आपका अपना झाकिर’ या शोसाठी विचारण्यात आलं, तेव्हा मी तत्काळ होकार दिला. या शोच्या प्रत्येक भागात झाकिरची स्टोरीटेलिंगची खास शैली दिसेल. तो आपल्या स्वतःच्या आणि त्याच्या संपर्कात येणाऱ्या लोकांच्या जीवनातील किस्से सांगेल. या गोष्टींमध्ये बऱ्याचदा चातुर्य आणि सुजाणता असते. प्रेक्षकांना या गोष्टी आपल्याशा वाटतील आणि त्यांना खूप हसवतील, त्यांच्या स्वतःच्या अनुभवांवर चिंतन करण्यास भाग पाडतील. या शोमध्ये ‘IT’ गर्ल अशी माझी ओळख आहे. ती एक पॅनलिस्ट असून ट्रेंडसेटर आहे. काय ट्रेंडी आहे आणि काय नाही, हे तिला बरोब्बर ठाऊक असते. शो च्या बहुतांश भागात मी ‘मी’च असणार आहे. एकंदरित आत्तापर्यंतचा हा अनुभव फारच छान होता!”
'आपका अपना झाकिर' लवकरच येत आहे, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!