Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*सागरिका म्युझिकची यशस्वी २५ वर्ष पूर्ण*

*सागरिका म्युझिकची यशस्वी २५ वर्ष पूर्ण* *नानाछंद' द्वारे सादर करणार नाना पाटेकरांमधील गीतकार*
*संगीत क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत रंगला २५वा वर्षपूर्ती सोहळा* आजवर विविधांगी संगीताची मेजवानी देत रसिक श्रोत्यांचे कान तृप्त करणारे ‘सागरिका म्युझिक’ हे नाव संगीतप्रेमींसाठी नवं नाही. कॅसेट-सीडीच्या काळापासून संगीतप्रेमींसमोर सुरेल संगीताचा अद्वितीय नजराणा सादर करण्याचे व्रत जोपासणाऱ्या सागरिका म्युझिकने आजच्या सिंगल्सच्या काळातही रसिकांच्या मनावर गारूड करणारी गाणी सादर केली आहेत. संगीत क्षेत्रात यशस्वी २५ वर्ष पूर्ण केल्या निमित्ताने सागरिका म्युझिक च्या वतीने एका भव्य समारंभाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. संगीत क्षेत्रातील अनेक नामवंतांनी त्यास आवर्जून हजेरी लावली. आणि सागरिका बाम आणि सागरिका म्युझिकच्या २५ व्या वर्षपूर्तीबद्दल अभिनंदन केले तसेच पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
संगीत क्षेत्रात २५ वर्षे पूर्ण केल्याचं औचित्य साधत 'नानाछंद' या अल्बमचे अनावरण याप्रसंगी करण्यात आले यावेळी बोलताना हा अतिशय खास अल्बम रिलीज करताना आम्हाला अतिशय आनंद होत असल्याची भावना सागरिकाच्या वतीने व्यक्त करण्यात आली. 'नानाछंद' या अल्बममधील गाणी नाना पाटेकर यांनी लिहिली असून, संगीतकार नीलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केली आहेत. वैशाली सामंत, राहुल देशपांडे आणि स्वप्नील बांदोडकर या तीन सर्वोत्कृष्ट गायकांच्या आवाजात ही गाणी रसिकांना ऐकायला मिळणार आहेत. या अल्बमची मांडणी-निर्मिती विक्रम बाम यांनी केली आहे. वरद कठापूरकर, सचिन भांगरे, विनायक नेटके आणि इतर प्रतिभावान संगीतकारांनी वादन केलं आहे. अवधूत वाडकर, तुषार पंडित आणि अजिंक्य धापरे रेकॉर्डिंग आणि मिक्स इंजिनिअर आहेत. ‘खरंतर अमराठी असूनही मला मराठी लोकांनी, इथल्या संस्कृतीने मला स्विकारलं. अतिशय मेहनतीने आज ‘सागरिका म्युझिक’ दिमाखात उभी आहे त्याला इथली आत्मियता कारणीभूत आहे. आजवर खूप मोठं पाठबळ मला संगीत क्षेत्रातल्या दिग्गजांनी दिलं ते यापुढेही तसेच राहील यात मला अजिबात शंका नाही, असं मनोगत सागरिका बाम यांनी व्यक्त केलं.
‘मी निसर्गात जास्त रमतो. त्यामुळे त्या सगळ्याशी माझी खूप जवळीक आहे. अनेकदा ते शब्द आपसूक ओठावर येतात. त्या शब्दांना निलेशने अतिशय मेहनतीने सुरांमध्ये गुंफलंय त्यातूनच ही गीत निर्मिती झाली. सागरिका म्युझिक आणि सागरिका बाम यांनी या गीतांना सुंदरतेने एका अल्बमच्या माध्यमातून प्रकाशित केलं आहे. याचा अतिशय आनंद मला आहे. असे भावोद्गगार ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी काढले. या हृदय समारंभात ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर, ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर गायक सुदेश भोसले यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आणि सागरिका म्युझिकला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या अल्बमच्या निमित्ताने नाना पाटेकरांमध्ये दडलेला संवेदनशील गीतकार जगासमोर येणार आहे. आजवर अभिनेता-दिग्दर्शक आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या नानांची सुरेल बाजू संगीत प्रेमींसमोर आणण्याचं काम सागरिकाच्या माध्यमातून केलं जाणार आहे. सागरिकाचं हे काम नक्कीच वाखाणण्याजोगं असून, वर्षानुवर्षे स्मरणात राहणारं ठरेल
*सागरिका म्युझिक विषयी* १९८४मध्ये जेव्हा सागरिका म्युझिकचा सांगितीक प्रवास सुरू झाला, जेव्हा हिरक दास यांनी भारतातील पहिला कॅसेट आणि सीडी उत्पादनाचा कारखाना सुरू केला. १९९४पर्यंत सागरिका अकोस्ट्रॉनिक्स दिवसाला १.५ लाख सीडी तयार करत होती. भारतातील विविध भाषांमध्ये संगीत तयार करण्यासाठी समर्पित संगीत लेबल तयार करून तरुण आणि प्रतिभावान गायक-संगीतकारांसाठी हक्काचं व्यासपीठ तयार करणं ही सागरिका म्युझिकच्या प्रवासातील पुढली महत्त्वाची पायरी ठरली. हिरक दास यांच्यानंतर सागरिका दास यांनी सागरिका म्युझिकचा कारभार सांभाळला. मागील २५ वर्षे त्या कंपनीच्या सीईओ आहेत. आपल्या आजवरच्या कारकिर्दीत सागरिका यांनी २०पेक्षा अधिक नवीन कलाकारांना संगीत क्षेत्रात लाँच करत त्यांच्या यशस्वी कारकीर्दीस हातभार लावला आहे. मागील काही वर्षांमध्ये सागरिकाने हिंदी, मराठी, बंगाली आणि इंग्रजीमध्ये ११,००० हून अधिक ट्रॅक्सची निर्मिती आणि विपणन केलं आहे. ३०० हून अधिक संगीत व्हिडिओ आणि डिजिटल कलाकृती, मुलांसाठी १०० अॅनिमेटेड चित्रपट आणि यशस्वी संगीतावर आधारित लाईव्ह टेलिव्हिजन कलाकृती तयार केल्या आहेत.
२०१९ मध्ये विक्रम बाम यांच्या रूपात सागरिकाच्या तिसऱ्या पिढीने या व्यवसायात पाऊल ठेवलं. बोस्टनमधील बर्कली कॉलेज ऑफ म्युझिकमधून पदवीधर झालेल्या विक्रम यांनी भारतीय संगीत उद्योगात निर्माता, संगीतकार आणि गायक-गीतकार अशी ख्याती मिळवली आहे. आई सागरिकासोबत काम करताना विक्रम पुढील २५ वर्षांसाठी या लेबलचं व्हिजन तयार करण्यात मदत करत आहेत. आजवर सागरिका म्युझिकच्या माध्यमातून उस्ताद रशीद खान, पं. अजय चक्रवर्ती, पं. हरिप्रसाद चौरसिया, पं. शिवकुमार शर्मा, पं. जसराज, सुरेश वाडकर, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत, अवधूत गुप्ते, अजय-अतुल, शंकर महादेवन, श्रेया घोषाल, महालक्ष्मी अय्यर, विजयप्रकाश, सचिन पिळगावकर, आदर्श शिंदे, अनुप जलोटा, शान, कुमार सानू, बिक्रम घोष अशा बऱ्याच दिग्गजांनी आपली कला संगीत प्रेमींपर्यंत पोहोचवली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.