*स्वातंत्र्यदिनी ‘अलबत्या गलबत्या’ रंगभूमीवर करणार विश्वविक्रम*
July 30, 2024
0
*स्वातंत्र्यदिनी ‘अलबत्या गलबत्या’ रंगभूमीवर करणार विश्वविक्रम*
प्रायोगिक, व्यावसायिक नाटय़सृष्टीच्या युगात सध्याच्या घडीला लहान मुलांसाठी काही विशेष नाटकं रंगभूमीवर आली आणि या नाटकांनी लहानांसोबत मोठ्यांचीही मने जिंकली. ‘अलबत्या गलबत्या’ हे नाटकही त्यापैकीच एक. रत्नाकर मतकरी लिखित हे नाटक रंगभूमीवर आणण्याचं शिवधनुष्य निर्माते राहुल भंडारे यांनी उचलले आणि या बालनाट्यानं इतिहास घ़डवला. तुफान लोकप्रियता मिळवणारं 'अलबत्या गलबत्या' नाटक आता एका नव्या विश्वविक्रमासाठी सज्ज झालं आहे.
झी मराठी प्रस्तुत आणि अद्वैत थिएटर निर्मित ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाची टीम येत्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला सलग ६ प्रयोग करत मराठी बालरंगभूमीच्या इतिहासात पहिल्यांदाच जागतिक विक्रम करण्यासाठी सज्ज झाले आहेत. सकाळी ७.०० ते रात्री १०.३० यावेळेत हे ६ विश्वविक्रमी प्रयोग दादरच्या श्री शिवाजी मंदिर मध्ये रंगणार आहेत.
मराठी रंगभूमीवर 'मैलाचा दगड' ठरलेल्या या नाट्यकृतीचा अशा प्रकारचा प्रयोग कलाकार, तंत्रज्ञ या सर्वांनाच एक मोठं आव्हान असलं तरी कलावंतांना हा नाट्यानुभव खूप काही शिकवणारा असेल असं मत निर्माते राहुल भंडारे यांनी व्यक्त केलं. हा भव्य नाट्यपट एकाच दिवशी, एकाच थिएटरमध्ये एकापाठोपाठ बघणं म्हणजे नाट्यरसिकांसाठी पर्वणीच आहे. या सलग नाट्यानुभवाच्या संकल्पनेला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून या नाटकाची जोरदार तिकीटविक्री सुरु झाली आहे. स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्याचा आनंद अधिक द्विगुणित करायचा असेल तर छत्रपती शिवाजी मंदिर ट्रस्ट यांच्या सहयोगाने ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाचे होणारे हे सलग प्रयोग अजिबात चुकवू नका.
अनेक विक्रमांना गवसणी घालत ‘अलबत्या गलबत्या’ बालनाट्याची घौडदौड सुरू आहे. कोविडचा काळ सोडला तर ६ वर्षात ८०० प्रयोगांचा टप्पा पार केला आहे आणि विक्रमी १००० व्या प्रयोगाकडे वाटचाल सुरू आहे. कलेप्रती असणारी बांधिलकी जपत कलाक्षेत्रासाठी वेगळं काहीतरी करू पाहणाऱ्या कलावंतांमध्ये निर्माते राहुल भंडारे यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाच्या प्रयोगाच्या तिकीटांसाठी नाट्यरसिकांनी लावलेल्या रांगा या त्याच्या अभूतपूर्व यशाची कल्पना देतात. या नाटकाने बालरंगभूमीवर अनेक यशस्वी प्रयोग केले आता सलग नाटय़ानुभवाचा ऐतिहासिक प्रयोग करत जागतिक विक्रमाच्या मानाचा तुरा ‘अलबत्या गलबत्या’नाटकाच्या शिरपेचात रोवला जाणार आहे. या सर्व नाट्यानुभवासाठी नाटकाच्या टीमने जय्यत तयारी सुरु केली आहे. कलाकार व संपूर्ण टीमचा डायटिशियनच्या सल्ल्याने आहार, डॉक्टरांची टीम, आरामाची व्यवस्था, सजावट ते इतर सगळी जय्यत तयारी या नाटकाच्या टीमने नव्या विश्वविक्रमासाठी केली आहे.
शाळा सुटता, पुस्तक मिटता, करुया आपण गमत्या जमत्या.. अलबत्या गलबत्या..... अलबत्या गलबत्या....अलबत्या गलबत्या... अलबत्या. असं म्हणत चिंची चेटकिणीची धमाल प्रेक्षकांना हसवत हसवत थरार, उत्सुकता आणि विनोदाची तिहेरी मेजवानी देते. चेटकीण झालेले निलेश गोपनारायण यांच्याबरोबरच सनीभूषण मुणगेकर, श्रद्धा हांडे आदि दहा कलाकारांची फौज आपल्या अफलातून उत्साहाने प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करते. या नाटकाचे दिग्दर्शन चिन्मय मांडलेकर यांनी केले आहे.