वैजू साकारताना माझ्या प्रेरणास्थानी होत्या दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटील,”--- ऋतुजा बागवे
June 18, 2024
0
*“वैजू साकारताना माझ्या प्रेरणास्थानी होत्या दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटील,” स्टार प्लस वाहिनीवरील ‘माटी से बंधी डोर’ या नव्या मालिकेतील वैजू ऊर्फ ऋतुजा बागवे सांगतेय तिच्या भूमिकेविषयी!*
‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘माटी से बंधी डोर’ या नव्या मालिकेत ऋतुजा बागवे आणि अंकित गुप्ता मुख्य भूमिका निभावत आहेत. ऋतुजा बागवे ही वैजयंती (वैजू) ही भूमिका साकारत असून अंकित गुप्ता रणविजयच्या भूमिकेत दिसेल.
महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये घडणाऱ्या या कथानकात वैजूचा संघर्ष आणि तिच्या प्रवासाची कहाणी बघायला मिळते, जी शेतात राबून पैसे कमावते आणि कुटुंबाला हातभार लावते. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच आहे. वैजू कुटुंबाभिमुख, मेहनती आणि दूरदर्शी आहे आणि आपले जीवनमान उंचावणे व गावाच्या सुधारणेसाठी काम करणे हे तिचे ध्येय आहे.
‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘माटी से बंधी डोर’ या मालिकेत वैजूच्या भावनिक उलथापालथीचे चित्रण करण्यात आले आहे, जी तिच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी सर्वतोपरी संघर्ष करतेय. रणविजयशी भेट झाल्यानंतर तिच्या आयुष्यात घडणारे बदलही या मालिकेतून बघता येतील.
या मालिकेत नातेसंबंधातील गुंतागुंत आणि संस्कृतीतील विशिष्ट बारकावे यांचेही चित्रण केले जाणार आहे. उद्भवलेल्या अनपेक्षित परिस्थितीत होणारे वैजू आणि रणविजय यांचे लग्नही प्रेक्षकांना पाहता येईल. तिचे जीवनमान उंचावत आणि गावात सुधारणा घडवून आणण्याची तिची महत्त्वाकांक्षा कायम ठेवत ज्या लग्नात प्रेमाचा लवलेश नाही, त्या विवाहाच्या नात्यात वैजूला प्रेम कसे प्राप्त होते, हे पाहणे रंजक ठरेल.
ऋतुजा बागवेने वैजूची भूमिका साकारली आहे. वैजू ही एक खंबीर, स्वतंत्र स्त्री आहे, जी निर्भयतेचे मूर्त रूप आहे आणि प्रख्यात अभिनेत्री स्मिता पाटील यांच्याप्रमाणेच, स्वप्ने पूर्ण करण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या सर्व महिलांकरता एक प्रेरणादायी उदाहरण आहे. वैजू आणि स्मिता पाटील यांच्यात आणखी एक साम्यस्थळ आहे, ते म्हणजे या दोघीही मराठमोळ्या आहेत आणि शक्ती व अभिमान यांचे चित्रण करणाऱ्या आहेत. स्मिता पाटील यांनी बाजार, मिर्च मसाला, अर्थ आणि अशा कितीतरी उल्लेखनीय चित्रपटांतून स्त्री सक्षमीकरणाच्या भूमिका चितारल्या आहेत, तर ऋतुजा बागवे हिने ‘नांदा सौख्य भरे’ आणि ‘चंद्र आहे साक्षीला’ या भूमिकांकरता प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. आश्चर्य वाटेल इतका सारखेपणा स्मिता पाटील आणि वैजू यांच्यात आहे, हे लक्षात घेता, निःसंशयपणे प्रेक्षकांकरता वैजूला बघणे हे आनंददायी असेल, कारण ती आपल्याला भूतकाळात घेऊन जाते आणि स्मिता पाटील यांची आठवण करून देते.
*‘स्टार प्लस’ मालिकेत ‘माटी से बंधी डोर’मध्ये वैजूची भूमिका करणारी ऋतुजा बागवे मनोगत व्यक्त करताना म्हणाली,* “माटी से बंधी डोर या मालिकेत, मी वैजूची व्यक्तिरेखा साकारत आहे, जी खंबीर आहे, स्वतंत्र आहे आणि निडर आहे. वैजू ही व्यक्तिरेखा साकारताना माझ्यासमोर दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटील यांचा आदर्श आहे. त्यांचा वेगळा लूक आणि ज्या साधेपणाने, अभिजाततेने त्या भूमिका साकारायच्या, त्यातून बरेच काही शिकत मी वैजूचे पात्र साकारत आहे. स्मिता पाटील या चित्तवेधक, निर्भय, सहजसुंदर आणि समतोल व्यक्तिमत्त्वाच्या जणू प्रतीक आहेत. त्या माझ्याकरता खरोखरीच प्रेरणास्थानी आहेत आणि माझ्या वैजू या व्यक्तिरेखेद्वारे, प्रेक्षकांना या वैजूत स्मिता पाटीलची झलक दिसावी आणि वैजू ही इतरांकरता प्रेरणा ठरावी असे मला वाटते.”
‘माटी से बंधी डोर’ ही मालिका ‘स्टार प्लस’ वाहिनीवर सोमवार ते रविवार संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित होते.