*“ड्रामा ज्युनियर्स च्या स्पर्धकांच्या वयाचा असताना मी माझी पहिली एकांकिका केली होती”- संकर्षण कऱ्हाडे*
June 22, 2024
0
*“ड्रामा ज्युनियर्स च्या स्पर्धकांच्या वयाचा असताना मी माझी पहिली एकांकिका केली होती”- संकर्षण कऱ्हाडे*
'ड्रामा ज्युनियर्स' च्या निमित्ताने संकर्षण कऱ्हाडे झी मराठीवर परीक्षकाच्या नव्या भूमिकेतून पदार्पण करत आहे. आपली उत्सुकता व्यक्त करताना संकर्षण म्हणाला "ही संधी माझ्यासाठी मोठी परीक्षा आहे कारण ह्यावेळी मी परीक्षक म्हणून झी मराठीवर दिसणार आहे. आतापर्यंत निभावल्या भूमिकांपैकी खूपच वेगळी आणि आव्हानात्मक भूमिका आहे ही. मी निवेदक म्हणून काम केलंय, स्पर्धक म्हणून काम केलंय, मी स्पर्धा जिंकलो आहे स्पर्धा हरलो सुद्धा आहे. पण मी परीक्षकाच्या खुर्चीवर कधीच बसलो नाहीये आणि आता ह्या नवीन जबाबदारीमुळे पोटात गोळा ही आला आहे. पण मी खूप सकारात्मक दृष्टीने ह्याकडे बघत आहे, आणि कोणाला तरी असं वाटतंय मी ह्या खुर्चीच्या लायक आहे ह्याचा मला आनंद आहे. माझा प्रयत्न असेल त्या लहान मुलांना उत्तम मार्गदर्शन करायचं, कारण हेच ते वय आहे ज्या वयामध्ये आलेले अनुभव, बोललं गेलेलं वाक्य, केलेलं काम आयुष्यभर लक्षात राहतं. मला सुद्धा माझी पहिली स्पर्धा, पहिली एकांकिका, पाहिलं बक्षीस, पाहिलं अपयश हे सगळं लक्षात आहे. ह्या लहान मुलांसाठी सगळ्यागोष्टी पहिल्या पहिल्या असणार आहेत, म्हणून त्यांच्या पहिल्या कामाचे, यशाचे, अपयशाचे अनुभवांचे आपण साक्षीदार होणार आहोत ह्याचा मला जास्त आनंद आहे. ह्या अनुभवातून जर त्यांना पुढे जाऊन असं वाटलं की संकर्षण दादा जे सांगतोय ते आपल्याला आयुष्यात कामाला येईल एवढं जरी त्यांना वाटलं तर त्याहून जास्त आनंद नाही. लहान मुलानं सोबत माझं चांगलं जमतं. मुळात मला गप्पा मारायची सवय आहे त्याच्यामुळे कुठच्या ही वयाच्या कुठल्या ही मुला / मुलींसोबत मी गप्पा मारू शकतो. माझ्या घरात माझी दोन जुळी बाळं आहेत हा अनुभव सुद्धा गाठीशी आहेच. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या गावातून ही मुलं निवडली गेली आहेत, आजकाल वायरल होण्याचं युग आलं आहे ह्या युगात ह्या स्पर्धेत सहभागी होऊन आपण स्वतःला कुठे पोहचवू शकतो हे तपासून पाहण्याचा एक वेगळा एलिमेंट ह्या शो मध्ये आहे. आता पर्यंतच्या ऑडिशन्स पाहून असं वाटतं की आजकालच्या मुलानं मध्ये खूप सहजता आलेली आहे कारण त्यांना एक्सपोजर मिळाले आहे. आम्ही लहान होतो तेव्हा एवढे माध्यम नव्हते. पण आताची मुलं मोबाईल, टीव्ही बघून वेगवेगळ्या स्पर्धा बघून खूप काही शिकत आहेत म्हणून त्यांच्या कामामध्ये सहजता आहे. पण हे सगळं असताना त्या मुलांमध्ये काम मिळवण्यासाठी जे गांभीर्य आहे ते कुठे हरवणार नाही ह्याची एक परीक्षक म्हणून मला काळजी घ्यायची आहे.
जेव्हा मी ह्या वयाचा होतो तेव्हा मी महाराष्ट्र भर एकांकिका करत फिरत होतो. माझं मुळ गाव मराठवाड्यातलं परभणी आहे. पण मी ह्यांच्या वयाचा होतो तेव्हाच कामाची सुरवात केली हे मात्र नक्की, ७ वर्षाचा होतो जेव्हा मी माझ्या पहिल्या नाटकात काम केले. मी शिक्षणाकडे गरजेपुरतं लक्ष देऊन इतरांची नाटकं पाहत होतो, पुस्तकं वाचायची सुरुवात केली होती आणि प्रायोगिक स्तरावर वेगवेगळ्या स्पर्धा करून महाराष्ट्रभर फिरत होतो. माझ्या प्रवासामधून मी हेच सांगेन ही स्पर्धा फार महत्वाची आहे. *आजकालच्या संवेदनशील वातावरणातून आपण जिंकू शकतो असं सर्वानाच शिकवले जातं पण आपण हरलो तर त्यातून कसं परत उभं रहायचं हे फार कमी वेळा सांगितले जातं आणि ते तुम्हाला इथून शिकायला मिळेल.* अपयश ही पुढच्या यशाची पायरी आहे हा अनुभव जेव्हा लाभतो तेव्हा आपल्याकडे येणार यश जास्त जोरात येत. तेव्हा सर्व स्पर्धकांना हेच सांगेन हा प्रवास एन्जॉय करा. "
*तर बघायला विसरू नका 'ड्रामा ज्युनियर्स' २२ जूनपासून शनिवार आणि रविवार रात्री ९ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.*