Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*पुण्यात रंगणार ‘ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सव’*

*पुण्यात रंगणार ‘ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सव’* मराठी संगीत रंगभूमी ही मराठी मनाच्या मर्मबंधातील ठेव… मराठी जनमानसात संगीत नाटकाचे प्रेम खऱ्या अर्थी रुजवण्यात अनेकांनी मोलाचे प्रयत्न केले. आवाजावरची हुकमत, रंगतदार आलापी, शास्त्र आणि भाव यांचा सहजसुंदर मेळ साधत स्व. गायिका ज्योत्स्ना भोळे यांनी मराठी संगीत रंगभूमी समृद्ध केली आणि आपल्या प्रतिभेचा, कर्तृत्वाचा ठसा उमटवला. अभिनयासोबतच संगीतातील योगदानासाठीही ओळखल्या जाणाऱ्या ज्योत्स्ना भोळे यांनी अवघ्या १३ व्या वर्षी शास्त्रीय गायिका म्हणून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. आपल्या स्वर्गीय सुरावटींनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या ज्योत्स्ना भोळे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी दरवर्षी सृजन फाउंडेशन आणि नांदेड सिटी, पुणे यांच्या वतीने 'ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सव' आयोजित करण्यात येतो. यंदाही २० व २१ जून अशा दोन दिवसीय ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या महोत्सवाचे १४ वं वर्ष आहे. टिळक स्मारक मंदिर, पुणे येथे सायं.४ ते ८ या वेळेत हा स्वरमहोत्सव रंगणार आहे. गुरुवार २० जूनला सुरवातीला महोत्सवाच्या प्रास्ताविके नंतर शिल्पा पुणतांबेकर, भाग्येश मराठे, सिनेअभिनेत्री व गायिका केतकी माटेगांवकर यांची नाट्यसंगीत मैफल सायं. ५ वा. होणार असून, त्यांना प्रशांत पांडव, उदय कुलकर्णी, केदार परांजपे, माऊली टाकळकर साथ करणार आहेत. शुक्रवारी २१ जूनला सायं. ५ वा. पं. संजीव अभ्यंकर, रुचिरा केदार, शाकिर खान यांची शास्त्रीय संगीताची मैफल होईल. त्यांना रोहित मुजुमदार, माधव लिमये, पांडुरंग पवार, अजिंक्य जोशी, अभिनय रवंदे साथ करणार आहेत. मिलिंद कुलकर्णी निवेदन करणार आहेत.
या महोत्सवाचे संयोजक अधिश प्रकाश पायगुडे यांनी सांगितले की, संगीत रंगभूमी हे मराठी रंगभूमीचे वैभव असून त्याचे जतन आणि संवर्धन केले पाहिजे या उद्देशाने माझे वडील प्रकाश पायगुडे, पं. शौनक अभिषेकी व ज्योत्स्नाबाईंची कन्या वंदना खांडेकर यांनी या महोत्सवाची सुरुवात केली.वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर हा वारसा मी पुढे चालू ठेवला आहे. आपण संगीत क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या २ गरजू मुलांना ज्यांनी आपलं आयुष्य शास्त्रीय संगीतासाठी वाहून घेतलंय त्यांना प्रत्येकी रु ११०००/- स्कॉलरशिप देतो. या वर्षीपासून आपण या कार्यक्रमात कै. प्रकाश पायगुडे स्मृती पुरस्कार देणार आहोत. यंदा हा सन्मान ज्येष्ठ शास्त्रीय गायिका शैला दातार यांना मिळणार आहे. हा महोत्सव विनामूल्य असून अधिकाधिक रसिकांनी या ‘स्वरोत्सवा’चा आस्वाद घ्यावा असे आवाहन सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष अधिश पायगुडे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.