‘अरे हाय काय अन् नाय काय' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला
May 28, 2024
0
‘अरे हाय काय अन् नाय काय'
पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला
मराठी रंगभूमीचे अनभिषिक्त सम्राट , आपल्या विनोदी अभिनयानं आणि अदाकारी ने तमाम अगदी बहुभाषिक नाट्यरसिकांच्या मनावर गेली कित्येक वर्षे गारुड घालणारे चिरतरुण अभिनेते प्रशांत दामले यांचा प्रसिद्ध ‘अरे हाय काय अन् नाय काय' हा डायलॉग पुन्हा एकदा रंगभूमीवर ऐकायला मिळणार आहे. त्याचे कारण मागील काही दशकात लोकाभिमुख असलेले 'गेला माधव कुणीकडे' हे नाटक पुन्हा एका रंगभूमीवर धुमाकूळ घालण्यास येतंय. हे नाटक 15 जूनपासून रसिकांच्या भेटीला येत असल्याची माहिती अभिनेते प्रशांत दामले , विनय येडेकर आणि नाटकातील कलाकार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
15 जूनला होणार नाटकाचा शुभारंभ
स्वतः दामले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला . 7 डिसेंबर 1992 ला रंगभूमीवर दाखल झालेल्या या नाटकाचे आजवर 1802 इतके प्रयोग झाले. मध्यंतरी काही वर्षे या नाटकानं 'ब्रेक' घेतला होता. पण रसिकांच्या प्रेमळ आग्रहाखातर पुन्हा हे धमाल नाटक रसिकांच्या भेटीला येतंय. मनोरंजन क्षेत्रात अजरामर होणाऱ्या चित्रपट , गीत - संगीत , संवाद यात त्या वेळी नाटकातील 'अरे हाय काय अन् नाय काय' हा संवाद खूप प्रसिद्ध झाला होता . सहजच 'अरे हाय काय अन् नाय काय' असे म्हणत रंगभूमीवर पुन्हा एकदा हास्याचे फवारे उडवायला प्रशांत दामले आणि विनय येडेकर ही जोडगोळी सज्ज झालीये. 'गेला माधव कुणीकडे' या विनोदी नाटकानं कित्येक वर्ष रसिकांचं मनोरंजन केलं. प्रशांत दामले आणि विनय येडेकर या दोघांच्या विनोदाच्या अफलातून टायमिंगवर प्रेक्षक फुल टू खुश झाली. 'अरे हाय काय अन् नाय काय' हा डायलाॅग आजही मराठी रसिकांच्या मनात घर करुन आहे.
नाटकाच्या पदार्पणातच नाटकाने चांगली ग्रिप घेतली होती . गौरी थिएटर्स निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित 'गेला माधव कुणीकडे' नाटकाचा शुभारंभ 15 जून रोजी वाशी येथील विष्णुदास भावे सभागृहात दुपारी 4.00 वाजता होणार आहे. तर तिकीट विक्रीचा शुभारंभ 1 जूनपासून फक्त ‘तिकीटालय’ अॅप वर होईल अभिनेता प्रशांत दामले यांनी सांगितले .
फक्त अन फक्त 63 प्रयोग होणार
वसंत सबनीस लिखित आणि राजीव शिंदे दिग्दर्शित 'गेला माधव कुणीकडे' नाटकाची संहिताच धमाकेदार होती. त्यातच सर्वच कलाकारांची अफलातून अशी भट्टी जमली . दोन महिलांशी लग्न केल्यामुळं ते लपविण्यासाठी निर्माण झालेला पेच आणि त्यातून आपसूकपणे निर्माण होणाऱ्या अनेक विनोदी प्रसंगामुळं रसिकांना हास्याची मेजवानी नाटकातून मिळते. मुख्य भूमिकेत प्रशांत दामले आहेत. तर विनय येडेकर, नीता पेंडसे, तन्वी पालव, राजसिंह देशमुख आणि अक्षता नाईक हे कलाकार आहेत. प्रकाशयोजना किशोर इंगळे यांची आहे. ध्वनी संयोजन प्रकाश खोत तर नेपथ्य प्रमुख मधुकर बाड आहेत. "मायबाप रसिकांसाठी 'गेला माधव कुणीकडे' हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणताना मला अतिशय आनंद होत आहे. तर केवळ रसिकांच्या आग्रहाखातर हे नाटक पुन्हा घेऊन येत आहे. हे नाटक नवीन पिढीसाठी मेजवानी असणार आहे. हे माझं पहिलं सुपरहिट नाटक होते. या नोकरीच्या जोरावरच नोकरी सोडली होती. याचे फक्त 63 प्रयोग होतील. 63 प्रयोग कशामुळे तर हे माझे वय आहे," असंही चिरतरुण अभिनेते प्रशांत दामले यांनी सांगितलं. समकालीन इतर काही नाटकं अजून करायची आहेत . त्यात ह्या नाटकाने आमच्या मनावर काही बाबी बिंबवल्या त्यातून हे नाटक प्रथम करतोय .
आठवणींचा खजाना
रंगभूमीवर पुन्हा पदार्पण करण्यास सज्ज असलेल्या या नाटकाच्या निमित्ताने अनेक आठवणी दामले , येडेकर यांनी जागवल्या .
सचिन तेंडुलकर याने ही हे नाटक चक्क तीन वेळा पाहिल्याचे आवर्जून सांगितलें.
बाबरी मशीद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगली दरम्यान ही हाऊसफुल शो केल्याचे आवर्जून सांगितले . त्यावेळी दौरा हा तीन चार आठवड्यां चां असे , गोव्यात प्रयोग करताना जाताना येताना अनेक अन्य प्रयोग कोकणात व्हायचे . दौरा म्हणजे पिकनिक असायची , खेळकर आणि अगदी घराची ओढ नसायची अशी परिस्थिती आणि वातावरण होते .
आयुष्यात दोन वेळा ज्या प्रयोग रद्द करण्याची नामुष्की माझ्यावर ओढवली होती , त्यातील एक " गेला माधव ---- " वेळची आठवण प्रशांत यांनी सांगितली . आवाज बसला म्हणून तिकिटाचे पैसे परत करून , माफी मागितली मात्र प्रेक्षक हॉल सोडायला तयार नव्हती . मात्र अर्ध्या तासाने आपोआप आवाज फुटला आणि नंतर नाटक त्याच दणक्यात पार पडल्याची अविस्मरणीय आठवण माझी न विसरणारी आहे , असे प्रशांत यांनी सांगितले .