*नात्याच्या विविध छटा उलगडणार 'मल्हार'* उत्सुकता वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित
May 23, 2024
0
*नात्याच्या विविध छटा उलगडणार 'मल्हार'*
उत्सुकता वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित
नात्यातील विविध छटा उलगडणाऱ्या ‘मल्हार’ चित्रपटाचा रंजक ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून मैत्री, प्रेम, विश्वास या भावना यात दिसत आहेत. व्ही मोशन प्रस्तुत या चित्रपटाचे प्रफुल पासड निर्माते असून दिग्दर्शन आणि लेखन विशाल कुंभार यांनी केले आहे. या चित्रपटात अंजली पाटील, शारीब हाश्मी, ऋषी सक्सेना, श्रीनिवास पोकळे, विनायक पोतदार, मोहम्मद समद, अक्षता आचार्य, रवी झंकाळ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या ७ जून २०२४ रोजी ‘मल्हार’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
गुजरातमधील कच्छच्या ग्रामीण भागात या तीन वेगवेगळ्या कथा घडताना ट्रेलरमध्ये दिसत आहे. यात दोन लहान मुलांची मैत्री, तरूण - तरूणीचे एकमेकांवर असणारे प्रेम आणि एका जोडप्याचे एकमेकांवर असणारा विश्वास अशा तीन कथांचा यात समावेश असून या कथा कोणत्या वळणावर जाणार हे औस्त्युक्याचे ठरणार आहे. हा चित्रपट भावनिक असला तरी लहान मुलांची धमालही यात दिसत आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल कुंभार म्हणाले, " तीन वेगवेगळ्या वयोगटाची ही कथा आहे. त्यामुळे त्यांच्या नात्यातील निरागसता, संभ्रम, घालमेल, विश्वास अशा अनेक भावना यात पाहायला मिळतील. ‘मल्हार’ हा एक कौटुंबिक चित्रपट असून नातेसंबंध कसे जुळतात आणि त्यांचा प्रवास कसा फुलत जातो, हे अतिशय रंजकतेने दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. ग्रामीण भागातील साधेपणा, गावच्या मातीतील सहवास, नात्यांमधील मुळं यावर हा चित्रपट आधारित असल्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल.’’