कलर्स मराठीवर ‘अंतरपाट’चा नवीन प्रोमो
May 03, 2024
0
*नशिबाने मांडला लग्नाचा घाट, पण नियतीने आणला दुराव्याचा 'अंतरपाट'*
कलर्स मराठीवर ‘अंतरपाट’चा नवीन प्रोमो
संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठी कायमच आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ‘कलर्स मराठी’चे प्रोग्रामिंग हेड म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर नवनवीन मालिका रसिकांच्या भेटीला येत आहेत.
'इंद्रायणी', 'सुख कळले', 'हसताय ना, हसायलाच पाहिजे! ’ या नव्या शोजनंतर 'अबीर गुलाल' या नव्या मालिकेचा टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असतानाच आता 'अंतरपाट' ही आणखी एक नवीन मालिका रसिकांच्या भेटीला आली आहे.
नुकताच या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला असून, त्यात हळदीचा समारंभ सुरू असल्याचे दिसतेय. उल्हासित, आनंदी वातावरण, लग्नाची लगबग, सजलेले घर, पाहुण्यांचा वावर दिसत आहे. लव्ह मॅरेजच्या काळात अरेन्ज मॅरेज करणाऱ्या गौतमीला परफेक्ट जोडीदार मिळाल्याने ती अतिशय आनंदी आहे. गौतमीला आपल्या जोडीदारासोबत प्रत्येक स्वप्नं पूर्ण करायचे आहे. प्रोमोमध्ये आपल्याला मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री रेशम टिपणीसही दिसत असून ती नवऱ्याच्या म्हणजेच क्षितीजच्या बाजुने आहे. गौतमीला वाटतेय की, क्षितिज हा सर्वोत्तम आणि परिपूर्ण असा नवरा आहे, जसा तिला हवा होता, अगदी तसा. पण खरंच क्षितिज या लग्नाने खुश आहे का? काय लिहिले आहे गौतमीच्या नशिबात? नशिबाने मांडला लग्नाचा घाट, पण नियतीने आणला दुराव्याचा अंतरपाट!
या मालिकेचा टिझर तुम्ही कलर्स मराठीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. 'अंतरपाट' या मालिकेत अशोक ढगे, रश्मी अनपट, रेशम टिपणीस यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही गोष्ट नेमकी काय असणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. या नवीन मालिकेसंदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी पाहात राहा कलर्स मराठी.