अंकुश चौधरी आणि निर्माते अभिषेक बोहरा येणार पहिल्यांदाच एकत्र
May 10, 2024
0
*अंकुश चौधरी आणि निर्माते अभिषेक बोहरा येणार पहिल्यांदाच एकत्र*
अभिषेक बोहरा फिल्म्स प्रस्तुत एका नव्या मराठी चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे नाव आणि अन्य बाबी सध्या गोपनीय असल्या तरी या चित्रपटात अंकुश चौधरी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. बॉलिवूड चित्रपटांची निर्मिती करणारे अभिषेक बोहरा या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. चित्रपटाची पूर्वतयारी सध्या सुरु असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
निर्माते अभिषेक बोहरा म्हणतात, "मराठी चित्रपटांचा आशय हा नेहमीच अर्थपूर्ण असतो. नवनवीन विषय मराठीत हाताळले जातात. त्यामुळेच मला एका चांगल्या मराठी चित्रपटाची निर्मिती करायची होती आणि मला याचा अत्यंत आनंद आहे की, पदार्पणातच मला इतका चांगला चित्रपट करण्याची संधी मिळतेय. त्यात मराठीतील सुपरस्टार अंकुश चौधरी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारतोय. त्यामुळे सगळंच उत्तम जुळून आले आहे. एक वेगळी कथा असलेला हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन नक्कीच करेल. चित्रपटाबद्दलच्या गोष्टी हळूहळू समोर येतीलच, तोपर्यंत प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागेल.''