आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळं आणि हटके पात्र म्हणजे येड लागलं प्रेमाचं मालिकेतील राया ही व्यक्तिरेखा – विशाल निकम
April 25, 2024
0
आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळं आणि हटके पात्र म्हणजे येड लागलं प्रेमाचं मालिकेतील राया ही व्यक्तिरेखा – विशाल निकम
स्टार प्रवाहवर २७ मे पासून सुरु होणाऱ्या येड लागलं प्रेमाचं मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या मालिकेतून विशाल निकम हटके अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहे. याआधी दख्खनचा राजा जोतिबा आणि साता जल्माच्या गाठी या स्टार प्रवाहच्या मालिकेतून विशालचा निराळा अंदाज प्रेक्षकांनी पाहिला आहे. येड लागलं प्रेमाचं मालिकेच्या निमित्ताने विशाल निकमने आपल्या भूमिकेचं वेगळेपण सांगितलं.
येड लागलं प्रेमाचं मालिकेविषयी....
माणसाला अंतर्बाह्य बदलून टाकतं ते प्रेम. प्रेमात समोरच्याला बदलण्याचा अट्टहास नसतो, जे जसं आहे ते अगदी तसं त्याच्या पूर्ण गुण-दोषांसकट स्वीकारणं म्हणजे प्रेम. येड लागलं प्रेमाचं ही मालिकाही प्रेमातल्या वेडपणाची साक्ष देणारी असेल. महाराष्ट्राचं कुलदैवत अशी ओळख असणाऱ्या विठुरायाच्या पंढरपुर नगरीत या मालिकेची गोष्ट घडणार आहे. राया आणि मंजिरी या मालिकेतली प्रमुख पात्र. एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या राया आणि मंजिरीचा प्रेमात पडण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे येड लागलं प्रेमाचं ही मालिका.
या मालिकेतल्या तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशिल?
मी या मालिकेत राया हे पात्र साकारत आहे. आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळं आणि हटके असं हे पात्र आहे. फणसासारखा वरवर काटेरी आणि कठोर वाटणारा राया आतून मात्र इमोशनल आहे. अनाथ मुलं आणि आजारी लोकांबद्दल त्याला विशेष आस्था आहे. काही वर्षांपूर्वी त्याने आपल्या आईला गमावलं. त्यामुळे स्त्रियांना तो मान देतो. कुठेतरी त्याच्याही नकळत तो आईचं प्रेम शोधतो आहे. रायाला खोटं बोलणं सहन होत नाही. कितीही वाईट असलं, कटू असलं तरी खरंच बोलायचं असं त्याचं मत आहे. रायाची विठ्ठलावर प्रचंड श्रद्धा आहे. खऱ्या आयुष्यातही माझं आणि विठुरायाचं खास नातं आहे. माऊलींच्या आशीर्वादामुळेच इथवरचा प्रवास मी करु शकलो. माझ्या घरी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. या मालिकेची गोष्ट देखिल पंढरपुरात घडते. त्यामुळे मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो.
मालिकेतून तू आणि पुजा बिरारी ही नवी जोडी पाहायला मिळतेय त्याविषयी...
पुजा बिरारीसोबत मी पहिल्यांदा काम करतो आहे. पुजा खूप समजूतदार आहे. ती स्वत:पेक्षा दुसऱ्याचा जास्त विचार करते. माणूस म्हणून ही सर्वात मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. पुजाच्या याच स्वभावामुळे आमचे सीन्स खूप छान होत आहेत. मालिकेत मंजिरी आणि रायाचे विचार फार वेगळे आहेत. मात्र खऱ्या आयुष्यात माझी आणि पुजाची छान मैत्री आहे. राया – मंजिरीच्या जोडीला प्रेक्षकांचं प्रेम मिळावं हीच इच्छा. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका येड लागलं प्रेमाचं २७ मे पासून रात्री १०.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.