Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*महाराष्ट्र दिनी प्रदर्शित होणार 'स्वरगंधर्व सुधीर फडके'* नवीन टिझर प्रदर्शित

*महाराष्ट्र दिनी प्रदर्शित होणार 'स्वरगंधर्व सुधीर फडके'* नवीन टिझर प्रदर्शित
ज्यांच्या अवीट सुरांनी साऱ्यांनाच वेड लावले, ज्यांच्या 'गीतरामायणा'ने प्रत्येक संगीतप्रेमीच्या मनात स्थान निर्माण केले, त्या बाबुजींचा आयुष्यपट लवकरच रुपेरी पडद्यावरून आपल्या भेटीला येत आहे. नुकताच 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटाचा दुसरा टिझर प्रदर्शित झाला असून एका प्रतिभाशाली आणि हरहुन्नरी गायकाचे जीवन या चित्रपटातून उलगडणार आहे. टीझरमध्ये 'माझ्या आयुष्याच्या खडतर प्रवासात पदोपदी सोसलेल्या जाणिवेतून, ही आर्तता माझ्या स्वरात उतरते, असे एक वाक्य आहे. या वाक्यातूनच 'बाबुजीं'च्या व्यक्तिमत्वाची ओळख होते.
रिडिफाईन प्रॉडक्शन्स निर्मित, योगेश देशपांडे दिग्दर्शित या चित्रपटात सुनील बर्वे, आदिश वैद्य, शरद पोंक्षे, सागर तळाशीकर, मृण्मयी देशपांडे, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद योगेश देशपांडे यांचे असून सौरभ गाडगीळ, योगेश देशपांडे या चित्रपटाचे निर्माते आहेत. 'स्वरगंधर्व सुधीर फडके' हा चित्रपट १ मे अर्थात महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असून आजवरचा हा सर्वात मोठा स्वरमयी बायोपिक ठरेल.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक योगेश देशपांडे म्हणतात, '' एखाद्या नावाजलेल्या व्यक्तिमत्वाचा जीवनपट पडद्यावर दाखवणे नक्कीच सोपे नसते. त्यासाठी सखोल अभ्यास अत्यंत गरजेचा आहे. 'बाबुजी' हे अवघ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व. मला त्यांचा जीवनपट पडद्यावर दाखवायचा होता. यासाठी मी जमेल तितकी त्यांच्याविषयी माहिती मिळवली. त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांना मी भेटलो. त्यांच्याविषयी काही अशा गोष्टी कळल्या, ज्या अनेकांना माहित नाही. त्यांचे तेच आयुष्य मी पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची गायली आपल्या सगळ्यांना माहित आहे, परंतु त्यामागचा संघर्ष खूप कठीण होता. त्यांचा हा प्रवास 'स्वरगंधर्व सुधीर फडके'मध्ये पाहायला मिळणार आहे.''

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.