प्रिया बापट यांना यंदाचा झी मराठी चित्रगौरव २०२४ 'मराठी पाऊल पडते पुढे' पुरस्कार जाहीर*
March 17, 2024
0
*प्रिया बापट यांना यंदाचा झी मराठी चित्रगौरव २०२४ 'मराठी पाऊल पडते पुढे' पुरस्कार जाहीर*
ह्या वर्षीचा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा हा खूप गाजणार आहे कारण बॉक्स ऑफिसवर हे वर्ष खऱ्या अर्थाने महिलांनी गाजवले मग तो 'बाईपण भारी देवा' सारखा चित्रपट असू दे किंवा मग 'झिम्मा २'. या गौरव सोहळ्यात महिला कलाकारांचा गौरव केला जाणार आहे. या पुरस्कार सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 'मराठी पाऊल पडते पुढे’ पुरस्कार, ह्यावर्षी या पुरस्काराची मानकरी ठरली ती म्हणजे 'प्रिया बापट'. मोठेपणी नेमकं काय करायचं हा प्रश्न तिला कधीच पडला नाही. कारण ‘कबुतरखाना, दादर मुंबई २८’ इथुन घरातून निघालेल्या तिच्या लहानग्या मनाला सगळंच करायचं होतं. तिला डेंटिस्ट पण व्हायचं होतं,शिवाजी पार्काला फे-या मारतांना तिला क्रिकटर व्हावसं वाटायचं, स्टेशन रोडचा सकाळचा फुलबाजार पाहून फुलांची शेती कराविशी वाटत होती,
इतकंच काय, तिला दाभण-दोरी घेऊन आपलीच चप्पल पण शिवायची होती!
पण ‘बालमोहन’, ‘विल्सन’, ‘रूईया’असं मजल दरमजल ‘कुल्ड, वुल्ड, शुल्ड’अडथळे पार करत, तिला ‘शिवाजी मंदिर’ आणि ‘प्लाझाच्या’ मधल्या डिव्हाईडरवर उभं असतांना जे व्हावसं वाटलं असेल…. ते खरं !
तिनं बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. चित्रपट डॅा. बाबासाहेब आंबेडकर, दिग्दर्शक जब्बार पटेल! आणि मोठी झाल्यावर अभिनयाची दुसरी इनिंग सुरू केली ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ ह्या चित्रपटाने, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यासोबत. काही जण तिला आजही ‘दे धमाल’ मालिकेतली चिमुरडी म्हणूनच ओळखतात. काहीजण तिला ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मधली तर काहीजण ‘काकस्पर्श’ मधली उमा म्हणून ओळखतात. नाट्यरसिकांसाठी तीची ओळख सक्षम निर्माती म्हणून आहे. हिंदी वेबविश्वातल्या ‘सिटी ॲाफ ड्रिम्स’ या बेवमालिकेतल्या तिच्या खंबीर राजकीय भूमिकेचं खूप कौतुक झालं.
काकस्पर्श, हॅपी जर्नी, टाईमप्लिज, आम्ही दोघी ,वजनदार इ. तिच्या चित्रपटांची यादी जरी वाचली तरी त्यातलं वैविध्य आणि तिची विचारपूर्वकता दिसून येते.
तिनं ‘नवा गडी नवं राज्य’ , ‘दादा,एक गुड न्यज आहे’ आणि ‘जर तर ची गोष्ट’ अशी तिन नाटकं अभिनेत्री आणि निर्माती ह्या भूमिकेतून अत्यंत यशस्वीपणे सांभाळली. मराठी मालिका, मराठी नाटक, मराठी चित्रपट , हिंदी चित्रपट , हिंदी वेबसिरीज, जाहिरात, अभिनय, निर्माती अशा अनेक क्षेत्रात तिचा वावर सातत्यपूर्ण आणि दर्जेदार आहे.
मालिका-चित्रपट ते वेबसिरिज व्हाया रंगभूमी अशी वाटचाल करणारी बहुरंगी प्रसन्न व्यक्तिमत्व असलेली आमची प्रिया बापट. आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे. झी मराठीकडून सदिच्छा. तुला ‘मराठी पाऊल पडते पुढे’ ह्या पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला अभिमान वाटत आहे.