*राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त नीलेश नवलाखा दिग्दर्शित आगामी चित्रपट*
March 05, 2024
0
*क्रौर्याच्या तत्त्वज्ञानाचा 'किमिदिन'मधून शोध*
- *राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त नीलेश नवलाखा दिग्दर्शित आगामी चित्रपट*
*पुणे येथे चित्रीकरणाला सुरुवात*
मानवी संवेदनांचा कानाकोपरा शोधत क्रौर्याचे तत्वज्ञान कसे आणि कुठून येते याचा मर्मभेदी शोध "किमिदिन" या चित्रपटातून घेतला जाणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त नीलेश नवलाखा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून, क्राइम थ्रिलर प्रकारातील या चित्रपटात तगडी स्टारकास्ट दिसणार आहे.
माधवी नवलाखा निर्मित "किमिदिन" या चित्रपटाचं लेखन संजय सोनवणी यांनी केलं आहे. संजय सोनवणी नामवंत साहित्यिक आणि अभ्यासक आहेत. त्यांनी अनेक कथा, कादंबरी, वैचारिक पुस्तकांचे लेखन केले आहे. अभ्यासपूर्ण लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. तर 'शाळा', 'अनुमती' आणि 'फँड्री' या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांची निर्मिती केलेले नीलेश नवलाखा या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. चित्रपटात मिलिंद शिंदे, राज साने, मानिनी दुर्गे, जयेश संघवी, प्रमोद काळे अशी उत्तम स्टारकास्ट आहे. तर साई-पियुष संगीत दिग्दर्शन, दर्शन ढावरे छायांकन, अविनाश सोनवणे ध्वनीसंयोजन करत आहेत.
चित्रपट जगतामध्ये क्राइम थ्रिलर हा लोकप्रिय प्रकार मानला जातो. या प्रकारातील अनेक चित्रपट गाजलेले आहेत. अत्यंत नृशंस पद्धतीने २१ खून केलेल्या सिरीयल किलर आरोपीच्या चौकशीसाठी एक पोलीस अधिकारी गेल्यावर तिथं चौकशी दरम्यान भावना आणि क्रौर्य याचे भयंकर मानवी-अतिमानवी नाट्य सुरू होतं या आशयसूत्रावर किमिदिन हा चित्रपट बेतला आहे. त्यामुळे सशक्त कथा, उत्तम स्टारकास्ट, उत्तम लेखक आणि दिग्दर्शक अशा योग किमिदिन या चित्रपटात जुळून आला आहे. त्यामुळे हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेईल यात शंका नाही.