Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

प्रवाह पिक्चरवर पाहायला मिळणार बहुचर्चित ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

प्रवाह पिक्चरवर पाहायला मिळणार बहुचर्चित ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर
मराठी अस्मितेचा बुलंद आवाज... प्रवाह पिक्चरवर पाहायला मिळणार बहुचर्चित ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर लोककला म्हण्टलं की शाहीर साबळेंचं नाव आपसुकच डोळ्यासमोर उभं रहातं. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचं फार मोठं योगदान आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले. शाहीर साबळे हे गीतकार, लोकनाट्याचे लेखक, विनोदवीर, नाट्यदिग्दर्शक, उत्तम गायक, उत्तम छायाचित्रकार आणि ढोलकी वादक अशा अनेक भूमिकांमधून महाराष्ट्राला भेटत राहिले. अश्या या बहुआयामी कलावंताची गोष्ट महाराष्ट्र शाहीर या सिनेमातून मांडण्यात आली आहे. रविवार १८ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता आणि रात्री ९ वाजता प्रवाह पिक्चरवर या बहुचर्चित सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर पहाता येणार आहे.
सुपरस्टार अंकुश चौधरी यांनी या सिनेमात शाहीर साबळेंची भूमिका साकारली आहे. याविषयी सांगताना अंकुश चौधरी म्हणाले, ‘या सिनेमाच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच चरित्रपटात काम केलं आहे. माझ्या कारकिर्दीमध्ये शाहीर साबळेंचा मोलाचा वाटा आहे. आपल्या आयुष्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तिवर सिनेमा बनणं आणि त्या सिनेमात आपल्यालाच त्या व्यक्तिची भूमिका साकारायला मिळणं यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते. अश्या या थोर कलावंताच्या आयुष्यावर बेतलेला महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा घरबसल्या प्रवाह पिक्चरवर पहाता येणार आहे याचा मनापासून आनंद आहे.’ महाराष्ट्र शाहीर सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा शाहीर साबळे यांचे नातू आणि मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सांभाळली आहे. तर केदार शिंदे यांची लेक सना शिंदेने शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती यांची भूमिका साकारली आहे. यासोबतच निर्मिती सावंत, मृण्मयी देशपांडे, अश्विनी महांगडे, अमित डोलावत, शुभांगी सदावर्ते, अतुल काळे आणि दुष्यंत वाघ अशी तगडी कलाकारांची फौज सिनेमात आहे.
मराठीचा स्वाभिमान आयुष्यभर जपणारे, मराठी लोकसंगीत आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवणारे शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या महाराष्ट्र शाहीर या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर पाहायला विसरु नका रविवार १८ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता आणि रात्री ९ वाजता फक्त प्रवाह पिक्चरवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.