Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'झिलमिल' गाण्यातून घडणार 'मुसाफिरा'ची सफर*

*'झिलमिल' गाण्यातून घडणार 'मुसाफिरा'ची सफर* 'मुसाफिरा' आणि 'मन बेभान' या उत्स्फूर्तदायी गाण्यांनंतर आता 'मुसाफिरा' चित्रपटातील तिसरे गाणे नुकतेच सोशल मीडियावर झळकले आहे. 'झिलमिल' असे या गाण्याचे बोल असून हे बहारदार गाणे सलीम मर्चंट यांनी गायले आहे. तर या गाण्याचे बोल अदिती द्रविड हिचे असून साई -पियुष यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. स्कॉटिश हायलँड्सच्या निसर्गरम्य वातावरणात हे गाणे चित्रित करण्यात आले असून डोळ्यांचे पारणे फिटणारे हे गाणे आहे. पुष्कर जोग, पूजा सावंत, पुष्कराज चिरपुटकर, स्मृती सिन्हा, दिशा परदेशी यांची घनिष्ट मैत्री या गाण्यातून समोर येत आहे. सफरीवर निघालेले हे 'मुसाफिरा' जीवनाचा पुरेपूर आनंद लुटताना दिसत असून हे या गाण्यातून मैत्रीतील प्रेमही झळकत आहे. हे गाणे जितके सुरेल आहे, तितकेच चित्रीकरणस्थळही आकर्षक आहे.
गाण्याबद्दल पुष्कर जोग म्हणतात ," 'झिलमिल' हे गाणे खरंच खूप भारी आहे. स्कॉटिश हायलँड्सच्या एका सुंदर ठिकाणी आम्ही याचे चित्रीकरण केले आहे. कोणीही प्रेमात पडेल असे हे स्थळ आहे. हे गाणे ऐकताना आणि पाहताना आपण स्वतःही तिथेच असल्याचा भास होईल. ही सफर आमच्यासाठीही खूप खास होती. हे गाणे ऐकताना तुम्हाला तुमच्या मित्रपरिवाराची आठवण आल्याखेरीज राहाणार नाही.'' आनंद पंडित मोशन पिक्चर्स, ऐश मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने, नितीन वैद्य प्रोडक्शन आणि गुझबम्प्स एंटरटेन्मेंट प्रस्तुत ‘मुसाफिरा’ चे दिग्दर्शन पुष्कर जोग यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.