Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

लोकशाहिर विठ्ठल उमप यांच्या आठवणीत रंगला १३वा 'मृद‌्‌गंध पुरस्कार' सोहळा*

*लोकशाहिर विठ्ठल उमप यांच्या आठवणीत रंगला १३वा 'मृद‌्‌गंध पुरस्कार' सोहळा* *ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान*
जीवनभर लोककलांचा जागर करीत आपल्या कार्यक्रमांद्वारे रसिकांना जणू आनंदाची अद्वितीय पर्वणी देणारे तसेच लोककलेला जीवन अर्पण केलेले लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृती प्रित्यर्थ विविध मान्यवरांना मृद‌्‌गंध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ठाणे येथील काशिनाथ घाणेकर सभागृहात रंगलेल्या स्मृतीसंगीत समारोहात मृद‌्‌गंध पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा या सोहळ्यात जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या प्रसंगी उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, उद्योग मंत्री उदय सामंत, गायक नंदेश उमप, माजी महापौर नरेश म्हस्के, गीतकार संदीप खरे, संगीतकार सलील कुलकर्णी, सरिता उमप यांच्यासह मनोरंजन विश्वातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
लोकशाहीर विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी स्मृतिसंगीत समारोह आणि मृद‌्‌गंध पुरस्काराचे भव्य आयोजन करण्यात येते. पुरस्कारांचे यंदाचे हे १३ वर्ष आहे. फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदेश उमप यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विठ्ठल उमप हे लोककलेचे हे विद्यापीठ असल्याचे मत व्यक्त करत सामंत म्हणाले की, यंदाचा हा पुरस्कार सोहळा १३वा आहे. १४ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृतीसंगीत समारोह रत्नागिरीमध्ये होईल. त्या सोहळ्याची जबाबदारी मी घेईन, असेही सामंत म्हणाले. अनुराधा भोसले यांनी ऊसतोड कामगार आणि शाळाबाह्य झालेले बालकामगार याकडे व्यासपीठावरून लक्ष वेधल्याने या विषयाला अनुसरून पुढील १५ दिवसांत सर्व उद्योजकांची बैठक लावून बालकामगार काढून टाकले जातील, असे आश्वासनही सामंत यांनी दिले. चिन्मयी सुमित यांनी उपस्थित केलेल्या मराठी शाळांच्या मुद्द्यावर डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, पालकांशी संवाद साधल्यावर समजते की, त्यांचा ओढा इंग्रजी माध्यमांकडेच असतो; पण यातूनच शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करू. शाळाबाह्य मुलांचे प्रश्न कसे हाताळता येईल यासंदर्भातही शिक्षण विभागाशी चर्चा करू, असे आश्वासनही गोऱ्हे यांनी दिले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिलीप प्रभावळकर म्हणाले की, मी अभिनयाचे कोणतेही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले नाही. मी चुकून या क्षेत्रात आलो आहे. ज्यांच्या कार्याला मी मानतो त्या लोकशाहीर विठ्ठल उमप या लोककलावंतांच्या नावाचा पुरस्कार आजच्या दिवशी मिळाला हे माझे भाग्य मानतो. नट म्हणून काही भूमिका आपण विसरतो पण काही भूमिकांचा माणूस म्हणून माझ्यावर परिणाम झाला आहे. त्या भूमिकांमुळे माझा काही सामाजिक संस्थांशी संपर्क आला, मी त्यांच्याशी जोडलो गेलो. नट म्हणून ही माझी मिळकत आहे. नट म्हणून तुमच्यात माणूसकीचा ओलावा जागृत राहीला पाहिजे अन्यथा तुम्ही फक्त कोरडे नट राहता असेही प्रभावळकर म्हणाले. इतर मृदगंध पुरस्कार विजेत्यांमध्ये संगीत क्षेत्रातील कामगिरीसाठी गायक सुदेश भोसले, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनुराधा भोसले, लोककलेतील कलावंत आतांबर शिरढोणकर, अभिनय क्षेत्रात उत्तम ठसा उमटवणारे अभिनेता सुमित राघवन, अभिनेत्री चिन्मयी सुमित, नवोन्मेष म्हणून गायिका केतकी माटेगावकर यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी 'आयुष्यावर बोलू काही' या संदीप खरे आणि सलिल कुलकर्णी यांच्या सदाबहार कार्यक्रमाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.