*संगीतकार 'प्रशांत नाकती'ने लग्नाळू मुलांसाठी आणलं खास कॉमेडी गाणं 'लडकी पाहिजे'...!!*
आत्ताच्या जेन झी जनरेशनच्या अतरंगी, सिंगल आणि लग्नाळू मुलांसाठी प्रसिद्ध संगीतकार प्रशांत नाकतीचं 'लडकी पाहिजे' हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. प्रदर्शित होताच या गाण्याने सोशल मीडियावर अक्षरशः वेड लावलयं. तीन अतरंगी मुलांचा, लग्नासाठी उत्सुक असलेला खट्याळ प्रवास या गाण्यात दाखवला आहे. या गाण्याचे दिग्दर्शन मनिष महाजन यांनी केले आहे. प्रशांत नाकती आणि संकेत गुरव हे या गाण्याचे संगीतकार आहेत. या गाण्याचे बोल प्रशांत नाकतीने लिहीले आहे. तर हे गाणं ट्रेंडींग गायक 'संजू राठोड' आणि ट्रेंडींग गायिका 'सोनाली सोनावणे' यांनी गायलं आहे. या गाण्यात नीक शिंदे, रितेश कांबळे, प्रतिभा जोशी, अभिषेक वाघचौरे आणि तनूश्री भोसले हे कलाकार आहेत.
या गाण्याविषयी प्रशांत नाकती सांगतो, "हे गाणं 'मी सिंगल' या गाण्याची आठवण करून देतं. आजकालची मुलं प्रेमाला अधिक महत्त्व देतात. त्यांना रिलेशनशिपमध्ये जास्त इंटरेस्ट असतो. आणि काही सिंगल मुलं देखील असतात. जे एकतर्फी प्रेम करतात. त्या सर्व मुलांना हे गाणं आपण डेडिकेट करू शकतो. यात गॅरेजमध्ये काम करणाऱ्या तीन अतरंगी मुलांच्या मनातील भावना यात दाखवली आहे. नाशिक येथील त्र्यंबकेश्वरला अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी या गाण्याचं चित्रीकरण झालं आहे. जवळपास तीन दिवस, मुसळधार पावसात या गाण्याचं चित्रीकरण सुरू होतं."
पुढे तो गाण्याच्या रेकॉर्डिंग विषयी सांगतो, "सध्याचा ट्रेंडींग गायक संजू राठोड याने हे गाणं गायलं आहे. खरंतर संजू फक्त स्वतःच कंपोज केलेली गाणी गातो. पण या वेळेस त्याने पहिल्यांदाच मी कंपोज केलेल़ं गाणं गायलं आहे. आम्ही दोघं हे गाणं रेकॉर्ड करताना फार उत्सुक होतो. विशेष म्हणजे लोकांच्या हे गाणं पसंतीस उतरलं आहे त्यामुळे अतिशय आनंद होत आहे."



