Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*‘नाळ भाग २’मधील ‘भिंगोरी’गाणे श्रोत्यांच्या भेटीला*

*‘नाळ भाग २’मधील ‘भिंगोरी’गाणे श्रोत्यांच्या भेटीला* २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘नाळ’ चित्रपट सुपरहिट ठरला. राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या या चित्रपटाशी प्रेक्षकांशी नाळ जोडली गेली. ‘चैत्या’चे बोबडे बोल सगळ्यांनाच भावले, गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली. आता ‘नाळ भाग २’ प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. ‘भिंगोरी’ असे गाण्याचे बोल असून ए. व्ही. प्रफुल्लाचंद्रा यांचे संगीत लाभलेल्या या गाण्याला वैभव देशमुख यांनी शब्दबद्ध केले आहे. तर या सुरेल गाण्याला मास्टर अवन, कडूबाई खरात, मनीष राजगिरे आणि नागेश मोरवेकर यांचा आवाज लाभला आहे. झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित, सुधाकर रेड्डी यक्कंटी दिग्दर्शित ‘नाळ भाग २’ १० नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०१८ साली ‘नाळ’मध्ये विदर्भातल्या नदीचं विस्तीर्ण पात्र दिसलं होतं. त्या पात्रात पाणी कमी, आणि वाळवंट जास्त होतं. असं असूनही पडद्यावर विदर्भ कधी नव्हे इतका विलोभनीय दिसला होता. ती कमाल होती सुधाकर रेड्डी यक्कंटी यांच्या कॅमेराची. तर अशा रखरखीत वातावरणातही माया करणाऱ्या माणसांच्या सावलीत चैतू घडत होता. आता ‘नाळ २’ मध्ये मोठा झालेला चैतू आपल्या खऱ्या आईला भेटायला पश्चिम महाराष्ट्रात आलाय. ‘भिंगोरी’ या गाण्यातून नजरेत भरतं ते पश्चिम महाराष्ट्रात डोंगररांगांनी वेढलेल्या गावाचं निसर्गसौंदर्य आणि या गावात आलेल्या चैतूला बघून आनंदी झालेले गावकरी. निसर्गाचं हिरवंगार रुप आणि गावकऱ्यांचं प्रेम बघून भारावलेला चैतू खऱ्या आईला बघतो, पण इथून पुढे त्याच्या हा प्रवास नेमका कुठवर जातो ती कहाणी चित्रपटात बघायला मिळेल.
‘जाऊ दे ना वं’ या पहिल्या भागातील लोकप्रिय गाण्यानंतर आता ‘भिंगोरी’ या गाण्यातून चैतूच्या या प्रवासाची सुरुवात बघायला मिळतेय. नात्यांमधले चढ-उतार आणि गुंता हा चैतूच्या अल्लड वयाला झेपेल का अशाच प्रश्न प्रेक्षकांना पडत असणार. १० नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर ‘नाळ’चा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, तेव्हा प्रेक्षकांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळतीलच. दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यक्कंटी म्हणतात, ‘’ गावातील खूप छोट्या छोट्या गोष्टी या गाण्यात टिपण्यात आल्या आहेत. गाण्याची टीमही अतिशय जबरदस्त आहे. ज्याप्रमाणे ‘नाळ’च्या गाण्यावर प्रेक्षकांनी प्रेम केले तसेच प्रेम ‘नाळ भाग २’मधील गाण्यांवरही करतील याची खात्री आहे. ‘’

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.