" स्वरगंधर्व सुधीर फडके " बायोपिक ची घोषणा
सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक सुधीर फडके यांच्या जीवनावरील मराठी चित्रपट "स्वरगंधर्व सुधीर फडके" या बायोपिक चित्रपटाची घोषणा, मुहूर्त क्लॅप आणि कलाकारांची अनोख्या पद्धतीने ओळख, हा सोहळा बाबूजींच्या १०५ व्या जन्मदिनी दि. २५ जुलै रोजी, मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात पार पडला.
चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक-निर्माते- योगेश देशपांडे यांच्या रिडिफाइन प्रोडकशन्स चा हा चित्रपट आता चित्रीकरणासाठी सज्ज झाला आहे.
या कार्यक्रमाला माजी राज्यपाल उत्तर प्रदेश आणि माजी खासदार राम नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच या चित्रपटाचे सह-निर्माते व पीएनजी ज्वेलर्स चे संचालक श्री सौरभ गाडगीळ आणि फडके परिवारातील चित्रा फडके या देखील यावेळी उपस्थित होत्या.
लेखक दिग्दर्शक म्हणून योगेश देशपांडे गेल्या ३ वर्षांपासून या विषयावर अभ्यासपूर्ण काम करीत आहेत. बाबूजी सुधीर फडके यांच्या जीवन प्रवासाचा सखोल अभ्यास करून एक दर्जेदार संगीतमय बायोपिक रसिकांसमोर मांडण्यासाठी पुरेपूर मेहनत घेऊन, अचूक पात्र निवड करून, सर्व उत्तम कलाकार, तंत्रज्ञ यांच्या बरोबरीने श्री श्रीधर फडके आणि कुटुंबियांच्या संमतीने या प्रकल्पाला पूर्ण करण्याकडे यशस्वीरित्या वाटचाल करीत आहेत.
चित्रपटाविषयी सांगताना योगेश देशपांडे म्हणतात की, आज इतक्या कालखंडानंतर हे जाणवते आहे की बाबूजींचा संगीत क्षेत्रातला ठसा किती मोठा आणि गडद आहे. तो आज देखील विविध वाहिन्यांवर अविरत सुरु असलेल्या रियॅलिटी शो नामक कार्यक्रमाचा सुद्धा आधार ठरतोय व नव्या पिढीला ती सुमधुर गाणी गावीशी वाटतात आणि म्हणून नव-नवीन गायक कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. ही खर तर बाबूजींच्या कारकिर्दीची जादू आहे हेच निर्विवाद सत्य आहे.
या सगळ्याची एक दुसरी बाजू मात्र मला प्रकर्षानं जाणवत रहाते, ती म्हणजे सुधीर फडके फक्त त्यांच्या सुमधुर गाण्यांमुळेच प्रेक्षकांच्या लक्षात असतात का? त्यांचं कर्तृत्व, यश, ते कसे मोठे गायक-संगीतकार होते, एवढेच प्रथमदर्शनी रसिकांना माहिती आहे. मात्र ते घडले कसे? लहानपणीचे राम फडके, मोठेपणीचे सुधीर फडके, आणि प्रसिद्ध संगीतकार बाबूजी, हा प्रवास नेमका कसा झाला आहे? याची पडद्यामागची कहाणी मिळवायचा प्रयत्न केला आणि त्यामधून तो प्रवास किती खडतर आहे हे उमगले. म्हणजे यश मिळवण्यासाठी त्यांनी किती हालअपेष्टा सोसल्या? किती जीवापाड कष्ट केले? अन्नान्न दिशा भटकंती काय प्रमाणात सोसली आहे? या सगळ्याची कल्पना सुद्धा केली तरी अंगावर काटा येतो. बाबूजींच्या या संघर्षाच्या काळाला अभ्यासताना आणि यशापर्यंत पोहोचताना सोसलेल्या कष्टांना समजून घेताना त्यांचे अनेक पैलू उलगडत गेले, ज्यामध्ये सावरकर भक्ती, देहप्रेम, संस्कार अश्या असंख्य गोष्टी आहेत.
त्यामुळेच मनाशी पक्क केलं कि आपण या महाराष्ट्र्याच्या वैभव असणाऱ्या व्यक्तीचे आयुष्य पुन्हा नव्याने जुन्या आणि नव्या पिढीसमोर आणूया आणि येणाऱ्या अनेक पिढयांना ते प्रेरणादायी ठरवूया आणि गेल्यावर्षी या चित्रपटाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. निर्मिती सहायक म्हणून श्री सौरभ गाडगीळ यांनी देखील पुढाकार घेऊन सहकार्य दिलं आणि आता प्रत्यक्ष चित्रीकरण सुरु झाले आहे. चित्रपटात छोटा राम, संघर्षाच्या काळातील तरुण सुधीर, आणि यशाची कवाड खुली करणारे बाबूजी, असा ३ टप्प्यातील प्रवास अनुभवायला मिळणार आहे. चित्रपटामध्ये मूळ बाबूजींच्या आवाजातील गाणी ही जमेची बाजू ठरणार आहे. या चित्रपटात साधारण २५ गाणी आहेत आणि चित्रपट यंदा डिसेम्बर पर्यंत प्रेक्षकांसमोर येईल असा मला विश्वास आहे असे योगेश देशपांडे म्हणाले.
कलाकार - बाबूजींच्या भूमिकेत- सुनील बर्वे, सुधीर च्या भूमिकेत - आदीश वैद्य, ग दि माडगूळकर- सागर तळाशीकर, राजा परांजपें - मिलिंद फाटक, अशा भोसले - अपूर्वा मोडक, माणिक वर्मा- सुखदा खांडकेकर, वीर सावरकर- धीरज जोशी आणि डॉ. हेडगेवार यांच्या भूमिकेत - शरद पोंक्षे हे प्रमुख कलाकार दिसणार आहेत.
सिनेमॅटोग्राफर- महेश आणे, कला दिग्दर्शक- महेश कोरे, रंगभूषा- सौरभ कापडे, वेशभूषा - सचिन लवळेकर हे तंत्रज्ञ आहेत.
चित्रपट गीतं , भावगीतं, अजरामर गीत रामायण, देशभक्ती चा जागर करणारे पैलूदार आयुष्य प्रेक्षकांसमोर चित्रपटातून रुपेरी पडद्यावर अनुभवता येणार आहे.
हा चित्रपट या च वर्षी म्हणजे २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. योगायोग म्हणजे अयोध्या राम मंदिर देखील या वर्षी पूर्ण होऊन भाविकांना खुला होणार. आणि गीत रामायणाच्या गीतांना पुन्हा एकदा जसेच्या तश्या स्वरूपात या चित्रपटातुन ऐकायला मिळणार आहेत असे लेखक-दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी नमूद केले.